

माणगाव: गेल्या तब्बल 16 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पाने विकासाचे स्वप्न दाखवले असले, तरी प्रत्यक्षात या प्रकल्पामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे चित्र समोर येत आहे.
महामार्गालगत असलेली हिरवाई नामशेष होत असून, प्रचंड उष्णता, पाण्याअभावी आणि देखभालीच्या दुर्लक्षामुळे नव्याने लावण्यात आलेली झाडेही करपून नष्ट झाली आहेत. परिणामी, एकेकाळी निसर्गरम्य वाटणारा हा मार्ग आज ओसाड, उजाड आणि तापलेल्या पट्ट्यासारखा दिसू लागला आहे.
पूर्वी या महामार्गालगत आंबा, जांभूळ, पळस, बहावा, पिंपळ, वड यांसारखी फळझाडे व सावली देणारी वृक्षसंपदा होती. या वृक्षांमुळे प्रवास सुखद, थंडावा देणारा आणि निसर्गाच्या सान्निध्यातील अनुभव देणारा ठरत होता. मात्र विकासाच्या नावाखाली ही सर्व हिरवाई नाहीशी झाली असून, “रस्ता मिळाला; पण निसर्ग हरवला,” अशी खंत प्रवासी व्यक्त करत आहेत.
दरम्यान, लोकप्रतिनिधींकडून महामार्गाचे 90 टक्के काम पूर्ण झाल्याचे दावे आणि जूनपर्यंत काम पूर्ण होण्याची आश्वासने दिली जात असली, तरी प्रत्यक्ष परिस्थिती पाहता प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मूलभूत सुविधांचा अभावही प्रकर्षाने जाणवतो. शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या बनली असून, अपघाताच्या प्रसंगी जखमींना साधे पाणीही उपलब्ध होत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. डोंगर उत्खनन, जंगलतोड आणि झाडांची घट यामुळे परिसरातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.
सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यावरून परावर्तित होणारी उष्णता प्रवास अधिकच असह्य करत आहे. जर गेल्या 16 वर्षांत नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण वृक्षलागवड झाली असती, तर आज हा महामार्ग पर्यावरणपूरक आणि सावलीदार ठरला असता.
येत्या पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करावी, तसेच लावलेल्या झाडांची नियमित देखभाल सुनिश्चित करावी, अशी जोरदार मागणी कोकणातील नागरिक व प्रवासी करत आहेत. हरवलेली हिरवाई परत मिळवण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर भविष्यात याचे गंभीर पर्यावरणीय परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.
68 हजार वृक्षांची तोड
महामार्गाच्या रुंदीकरणासाठी शासकीय आकडेवारी नुसार सुमारे 68 हजार जुन्या वृक्षांची कत्तल करण्यात आली. मात्र स्थानिकांच्या मते, प्रत्यक्षात हा आकडा याहून अधिक असून हजारो वृक्ष निर्दयपणे नष्ट करण्यात आले.
या झाडांमुळे मिळणारी सावली आणि नैसर्गिक थंडावा पूर्णतः नाहीसा झाल्याने प्रवाशांना उन्हाच्या कडाक्यातून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी किलो मीटरच्या अंतरावर एकही झाड दिसत नसल्याने प्रवास अधिकच त्रासदायक बनला आहे.
एक कोटी वृक्ष लागवड कागदावरच
या प्रकल्पांतर्गत दुतर्फा तब्बल एक कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ 9 ते 10 हजार झाडांची लागवड झाल्याचे दिसून येते. ही बाब पर्यावरणीय बांधिलकीची उघडपणे केलेली पायमल्ली असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. याशिवाय, महामार्ग पूर्ण होण्यापूर्वीच टोल नाके उभारण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.