

बदलापूर : कुळगांव-बदलापूर शहराच्या विकासासाठी राज्य सरकार आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात कुळगांव-बदलापूर नगरपालिकेवर सत्ता दिल्यास निधी झिरपू न देता बदलापूरकरांना अपेक्षित असलेले विकास प्रकल्प आम्ही मार्गी लावू आणि त्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री म्हणून माझी असेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मधल्यामध्ये पैसे हडपणाऱ्यांना सत्तेतून बाहेर काढा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस बदलापूर येथे आले होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी एमएम आरडीए रिजनमधील अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका क्षेत्रासाठी गेल्या दहा वर्षात केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री म्हणाले, भविष्यात बदलापूरसाठी मेट्रो प्रकल्प, उपनगरीय रेल्वेचे आधुनिकीकरण उल्हास नदीच्या रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन संदर्भात पुनर सर्वेक्षण करून नागरिकांना विकास कामांमध्ये दिलासा देण्या संदर्भातील आवश्यक ती पाऊल उचलणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी आमदार किसन कथोरे यांनी केलेल्या मागण्या यापूर्वीही मान्य करून त्यांना गती दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी भाजपा आमदार किसन कथोरे यांनी नगरपालिकेत होत असलेल्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. तर वनमंत्री गणेश नाईक यांनी बदलापूर शहराच्या विकासाकरिता भाजपच्या उमेदवारांना पाठबळ देण्याचा आवाहन केले.
मेट्रो प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करणार
मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीए रिजनमधील अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका क्षेत्रासाठी गेल्या दहा वर्षात केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. बदलापूरमधील मेट्रो प्रकल्प येत्या तीन ते साडेतीन वर्षात पूर्ण करण्याचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले.
उपनगरात राहणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी शहराच्या नियोजनबद्ध विकासाची ब्लू प्रिंट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राज्य सरकार करेल. एमएमआरडीए क्षेत्रातील प्रत्येक घरात 24 तास पाणी देण्याचा मानस देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यासाठी धरणांची निर्मिती एमएमआरडीए च्या निधीतून जलसंपदा विभाग करणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.