मुंबई ः राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती मुंबई जिल्हा भेटीसाठी आज (शुक्रवार) यशवंतराव चव्हाण केंद्र येथे संबंधित सर्वांशी संवाद साधणार आहे.
समितीकडून सामान्य नागरिक, भाषातज्ज्ञ, विचारवंत, मराठी भाषेशी संबंधित किंवा संलग्न शासकीय किंवा अशासकीय/ खासगी संस्था यांचे अध्यक्ष/ सदस्य, राजकीय पक्षांचे नेते/ लोकप्रतिनिधी, प्राथमिक/ माध्यमिक, शिक्षक संघटना यांचे अध्यक्ष सदस्य, पालक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, आंदोलनकर्ते आदीबरोबर संवाद साधणार असून त्रिभाषा धोरणासंदर्भात त्यांची मते व विचार जाणून घेणार आहे.
सकाळी 9 वाजता मुंबई जिल्ह्याकरिता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच त्याच दिवशी दुपारी 3 ते 5 वाजता ऑनलाईन व्ही.सी. द्वारे ठाणे/ रायगड/ पालघर या जिल्ह्यांकरिता ऑनलाईन व्ही.सी. द्वारे संवाद साधला जाणार आहे.
दरम्यान, मराठी अभ्यास केंद्र तसेच शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती यांच्या एकत्रित प्रयत्नाने पहिलीपासून हिंदी/त्रिभाषासक्तीचे महाराष्ट्रद्रोही राजकारण (2025) ही पुस्तिका 21 नोव्हेंबर 2025 रोजी आम्ही प्रकाशित केली. ती पुस्तिका हेच आमचे डॉ. नरेंद्र जाधव यांच्या त्रिभाषा समितीस दिलेले उत्तर आहे, असे मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी सांगितले.
पहिलीपासून त्रिभाषा धोरणाच्या सूत्राची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या डॉ. नरेंद्र जाधव समिती भेटीचा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयांसह मुंबईतील महापालिका शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गेल्या चार दिवसांपासून बैठकांचा जोर होता. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व शिक्षणाधिकारी (योजना) आदी अधिकाऱ्यांची टीम कामाला लावण्यात आली आहे.