

ठाणे/रायगड: रायगडसह संपूर्ण कोकणपट्ट्यात शनिवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. पावसापेक्षा मोठा तडाखा दिला तो वादळी वाऱ्याने. त्यात अनेक झाडे उन्मळून पडली, पत्रे उडाली. काही ठिकाणी वीजेचे खांब आडवे झाले आणि अंधार पसरला. फळपिकांनाही मोठा फटका बसला. ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या सर्व जिल्ह्यांतच हा वादळी पाऊस पडला.
वादळी वाऱ्याचे सर्वाधिक थैमान दिसले ते रायगड जिल्ह्यात महाड, माणगांव, पाली-सुधागड, नागोठणे येथे झालेला वादळी पाऊस आणि तळा येथे झालेल्या गारांच्या वर्षावामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. तळा तालुक्यातील फळशेत येथे वीज पडल्याने 14 वर्षीय वेदांत साळुंखे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
चांडवे खुर्द, कांबळे तर्फे, महाडमध्ये 20 पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले. महाडच्या चांदेक्रीडांगण परिसरात व शहराच्या झाडे उन्मळून पडली. नवेनगर येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात एका घराचे पत्र्याचे छप्परच रस्त्यावर येऊन पडली. सुदैवाने इथे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मौजे चांढवे खुर्द येथे काही घरांचे पत्रे उडाली. परांजपे हायस्कूल परिसरात झाड कोसळून तीन विद्युत खांब कोसळून वीज पुरवठा खंडित झाला.
माणगावातही अवकाळी वादळी पावसाने थैमान घातले. विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने तब्बल दीड तास तालुक्याला झोडपून काढले. त्यात वीजपुरवठा खंडित झाला. प्रमुख बाजार पेठही ठप्प झाली.
सुधागड तालुक्यात तुफानी वाऱ्यामुळे महावितरणचे सुमारे 40 विद्युत खांब कोसळले. अनेक ठिकाणी तारा तुटल्याने संपूर्ण परिसर काळोखात बुडाला आहे. 6 गावांमधील 24 घरांचे अंशतः नुकसान झाले. कवेळेत पोल्ट्री शेडचे पत्रे उडाल्याने सुमारे 1,500 ते 2,000 कोंबड्या दगावल्या. भैरव गावातील अनेक घरांवरील पत्रे उडाल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. तळा तालुक्यात मुसळधार पावसासह गारा पडल्या.