

कल्याण : केडीएमसी अंतर्गत कचरा उचलणाऱ्या सुमित कंपनीच्या कंत्राटी कामगारांचे वेतन रखडल्याने शहरातील कचरा व्यवस्थापन यंत्रणा ठप्प होण्याच्या मार्गावर पोहोचली आहे. अचानक पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आजच पगार देण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, पगार न मिळाल्यास उद्यापासून एकही कचरा गाडी रस्त्यावर उतरू देणार नाही, असा इशारा कामगार संघटनेने दिला आहे.
केडीएमसी हद्दीत कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या सुमित कंपनीच्या कंत्राटी कामगारांचे वेतन पुन्हा एकदा रखडल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली. वेतन न मिळाल्याच्या निषेधार्थ कामगारांनी अचानक कामबंद आंदोलन पुकारल्याने सकाळपासूनच शहरातील कचरा उचलण्याची संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली.
या आंदोलनाचा फटका नागरिकांना बसला असून शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. विशेषतः डोंबिवली - ठाकुर्ली परिसरात परिस्थिती गंभीर बनली असून दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.