

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगर सार्वत्रिक निवडणुकीसाठी कल्याण आणि मुरबाड तालुक्याच्या विविध सरकारी कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासनाच्या निर्देशांप्रमाणे नियुक्त करण्यात आले आहे. यातील अनेक कर्मचारी निवडणूक कामासाठी हजर झाले. मात्र पंचायत समिती, वस्तू आणि सेवा कर, कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी अशा अनेक विविध सरकारी कार्यालयांमधील एकूण २७कर्मचारी पालिका निवडणूक कामासाठी हजर न झाल्याने महापालिका प्रशासनाने या २७कर्मचाऱ्यांविरूद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात बुधवारी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आचारसंहिता पथकाचे साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आरोपी असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्थिर सर्वेक्षण पथक, फिरते सर्वेक्षण पथक, व्हिडिओ सर्वेक्षण पथक आणि इतर निवडणूक कामासाठी या कर्मचाऱ्यांच्या केडीएमसी निवडणूक विभागाने नियुक्त्या केल्या होत्या.
या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पालिकेने अनेकदा संपर्क साधून, तसेच निरोप देऊनही निवडणूक कामासाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे केडीएमसीने या २७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे जाहीर झालेल्या निवडणुकांसाठी कल्याण, डोंबिवली शहर विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर झाल्या आहेत.
गुन्हा दाखल झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वारंवार संपर्क करूनही त्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त अभिनव गोयल यांनी काढलेल्या आदेशाला जुमानले नाही. आणि निवडणूक कामासाठी कर्तव्यावर हजर झाले नाहीत. निवडणूक या राष्ट्रीय कामाचे कर्तव्य बजावण्यात कसुरी केली म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप रोकडे, सहाय्यक आयुक्त.