

मुंबई : राज्यातील केंद्र शाळांच्या स्तरावर क्रीडाशिक्षकपदाला शालेय शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार क्रीडाशिक्षकांची ४ हजार ८६० पदे मंजूर करण्यात आली आहेत. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय (जीआर) प्रसिद्ध केला.
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक संवर्गातील २ लाख ३६ हजार २२८ पदे पायाभूत पदे (प्राथमिक) निश्चित केली आहेत. राज्यातील समूहसाधन केंद्रांची (केंद्र शाळा) २१ ऑगस्ट २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुनर्रचना केली आहे. राज्यात सद्यस्थितीत ४ हजार ८६० समूह साधन केंद्रे अस्तित्वात आहेत. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाद्वारे संचमान्यतेचे निकष सुधारित करण्यात आले आहेत.
त्यानुसार केंद्रस्तरावर प्रत्येकी एक याप्रमाणे क्रीडाशिक्षक संवर्गातील पद मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (क्रीडा) हा ४ हजार ८६० पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झाला आहे, तर ८ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (दिव्यांग विद्यार्थी अध्यापन) संवर्गातील प्रत्येकी एक पद मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (दिव्यांग विद्यार्थी अध्यापन) हा ४ हजार ८६० पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर मंजूर असलेल्या पायाभूत पदांची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ओलांडता येत नाही, ही वस्तुस्थिती विचारात घेऊन या मयदित दोन संवर्ग निर्माण करण्यात आले आहेत. तसेच, जिल्हानिहाय क्रीडाशिक्षकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.
एखाद्या वर्षाच्या संचमान्यतेनुसार काही जिल्ह्यांत उपलब्ध होणारी पदे मंजूर पदांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत इतर जिल्ह्यांतील पदे तात्पुरत्या स्वरूपात समायोजित करण्याचा अधिकार शिक्षण आयुक्तांना असेल. मात्र, संपूर्ण राज्यासाठी मंजूर असलेल्या एकूण पायाभूत पदांच्या मयदितच तात्पुरत्या पदांचे समायोजन करता येईल.
सर्वाधिक क्रीडाशिक्षक पुणे जिल्ह्यात
जिल्हानिहाय निश्चित करण्यात आलेल्या विशेष शिक्षक (क्रीडा) या पदाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक ३०६ शिक्षक पुणे जिल्ह्याला मिळणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला २५१, अहिल्यानगर जिल्ह्याला २४६, नाशिक जिल्ह्याला २४४, रायगड जिल्ह्याला २२८, सातारा जिल्ह्याला २२३ शिक्षक मिळणार आहेत, तर सर्वात कमी भंडारा जिल्ह्याला ६०, हिंगोली जिल्ह्याला ६८, वाशिम जिल्ह्याला ७१, धाराशिव जिल्ह्याला ८० शिक्षक मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.