Kalyan Dombivli Encroachment: कल्याण-शिळ महामार्गावर अतिक्रमणे वाढल्याने वाहतूककोंडी फुटणार कशी ?

काटई नाका ते दुर्गाडी मार्ग अतिक्रमणमुक्त करा; खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या केडीएमसी आयुक्तांना सूचना
Kalyan Dombivli Encroachment
Kalyan Dombivli Encroachmentpudhari photo
Published on: 
Updated on: 

कल्याण/डोंबिवली : कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांसह परिसरातील लाखो नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या काटई नाका ते दुर्गाडी या मुख्य मार्गावरील वाढत्या अतिक्रमणांविरोधात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संपूर्ण महामार्गावरील अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या आणि बेकायदेशीर दुकाने तातडीने हटवून, परिसराची व्यापक स्वच्छता व सुशोभीकरण करण्याच्या मागणीकडे त्यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांचे सोमवारी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील काटई नाका ते दुर्गाडी हा रस्ता सर्वाधिक वर्दळीचा असून दररोज हजारो प्रवासी, नोकरदार वर्ग, विद्यार्थी आणि व्यावसायिक वाहने या मार्गाचा वापर करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या, दुकाने व अस्ताव्यस्त पार्किंग मोठे वाढले आहे. यामुळे रस्ता अरुंद झाला असून नागरिकांना दररोज प्रचंड वाहतूक कोंडीचा आणि मन:स्तापाचा सामना करावा लागत आहे. तसेच पादचाऱ्यांना चालण्यासाठी सुरक्षित जागा शिल्लक राहिलेली नसल्याने अपघाताचा धोकाही वाढला असल्याचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.

Kalyan Dombivli Encroachment
Jack Snipe Bird : नवी मुंबईच्या पक्षीविश्वात दुर्मीळ 'जॅक स्नाइप'ची नोंद

अतिक्रमणांसोबतच अनधिकृत दुकाने व टपऱ्यांमधून निघणारा कचरा आणि राडारोडा रस्त्याच्या कडेला टाकला जात असल्याने परिसराचे विद्रूपीकरण होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कल्याण-डोंबिवलीची ओळख अधिक सकारात्मक आणि स्वच्छ बनविण्यासाठी कल्याण-शिळ महामार्ग अतिक्रमणमुक्त व सुंदर करणे ही काळाची गरज असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेने काटई नाका ते दुर्गाडी या संपूर्ण महामार्गावरील सर्व अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या, दुकाने व इतर अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात तातडीने हटवावीत आणि भविष्यात येथे पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची कायमस्वरूपी दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सुशोभीकरण आराखडा तयार करावा...

संपूर्ण मार्गावर आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या परिसरात तत्काळ डीप क्लीन मोहीम राबवून साचलेला कचरा व राडारोडा उचलावा. तसेच नियमित स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी यंत्रणा कार्यान्वित करावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. याशिवाय वर्दळीच्या असलेल्या या महामार्गाला आधुनिक व देखणे रूप देण्यासाठी दुभाजकांचे सुशोभीकरण, वृक्षारोपण, पादचाऱ्यांसाठी सुसज्ज व अतिक्रमणमुक्त पदपथ आणि पुरेशी पथदिव्यांची व्यवस्था यांचा समावेश असलेला सविस्तर असा सुशोभीकरण आराखडा तयार करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची सूचना खा. डॉ. शिंदे यांनी केली आहे.

Kalyan Dombivli Encroachment
Madgaon Express Delay : मडगाव एक्‍स्‍प्रेसची सतत रखडपट्टी

या संदर्भात आयुक्तांनी आपल्या स्तरावरून तातडीने संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी व अतिक्रमण विभागाला आवश्यक ते निर्देश द्यावेत आणि केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल आपल्या कार्यालयास सादर करावा, अशीही सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.