Jack Snipe Bird : नवी मुंबईच्या पक्षीविश्वात दुर्मीळ 'जॅक स्नाइप'ची नोंद

१८ वर्षांच्या पक्षीनिरीक्षणात प्रथमच दर्शन; टी. एस. चाणक्य पाणथळ परिसरात छोट्या पाणलाव्याचे दर्शन
Jack Snipe Bird
करावे येथील टी. एस. चाणक्य पाणथळ परिसरात आढळलेला दुर्मिळ जॅक स्नाइप. (छाया : निलेश तांडेल)
Published on: 
Updated on: 

नवी मुंबई : नवी मुंबईच्या समृद्ध पाणथळ प्रदेशात पक्षीविश्वातील एका दुर्मिळ पाहुण्याचे आगमन झाले आहे. करावे गावाजवळील टी. एस. चाणक्य पाणथळ परिसरात अत्यंत दुर्मिळ असा 'जॅक स्नाइप' अर्थात छोटा पाणलावा हा पक्षी आढळून आला आहे. या दुर्मिळ पक्ष्याचे छायाचित्रण करण्याची संधी पक्षी छायाचित्रकार निलेश तांडेल यांना मिळाली. त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या या दुर्मिळ पक्ष्यामुळे नवी मुंबईच्या पक्षीविश्वातील जैवविविधतेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

गेल्या १७ ते १८ वर्षांपासून नवी मुंबईतील पाणथळ प्रदेशांसह देश-विदेशातील विविध ठिकाणी पक्षी छायाचित्रण आणि निरीक्षण करणाऱ्या तांडेल यांनाही जॅक स्नाइपचे यापूर्वी कधी दर्शन झाले नव्हते. इतक्या वर्षांच्या पक्षी निरीक्षणाच्या प्रवासात नजरेस न पडलेला हा दुर्मिळ पक्षी अचानकपणे टी. एस. चाणक्यच्या पाणथळ परिसरात दिसल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला.

Jack Snipe Bird
Dombivli MIDC Water Contamination : एमआयडीसीच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे रवाना; आरोग्य विभागाची घरोघरी तपासणी

नवी मुंबईचा पाणथळ परिसर हा देशी तसेच स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचा अधिवास मानला जातो. हिवाळ्याच्या काळात विविध देशांतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून अनेक पक्षी या परिसरात दाखल होतात. जॅक स्नाइप हा पाणथळ जागी आढळणारा एक लहान आकाराचा स्थलांतरित पक्षी आहे, स्नाइप प्रजातींमधील हा सर्वात लहान पक्षी असून, आपल्या उत्तम छद्मावरण आणि वैशिष्ट्यपूर्ण हालचालींसाठी तो ओळखला जातो.

मात्र, जॅक स्नाइपसारख्या दुर्मिळ पक्ष्याचे दर्शन होणे ही पक्षी निरीक्षकांसाठी विशेष आकर्षणाची बाब ठरली आहे. पक्षी छायाचित्रण म्हणजे केवळ कॅमेऱ्यात एखाद्या पक्ष्याचे सुंदर छायाचित्र टिपणे नव्हे, तर निसर्गाच्या कुशीत तासन्तास संयमाने थांबून एखाद्या अनोख्या क्षणाची प्रतीक्षा करणे होय.

Jack Snipe Bird
AC Local Train Attack : झोपमोड केल्याने प्रवाशाचा रेल्वे अधिकाऱ्यावर हल्ला

कधी अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतरही या पक्षाची हवी ती झलक सहजपणे मिळत नाही. मात्र, निसर्ग कधी अचानक असा काही अनमोल ठेवा समोर आणतो की, वर्षानुवर्षांचा प्रवास सार्थकी लागतो. जॅक स्नाइपचे दर्शन हा पक्षी प्रेमींसाठी एक असाच एक आनंददायी आणि अविस्मरणीय अनुभव ठरत आहे.

निसर्गाचा अनमोल ठेवा

नवी मुंबईच्या पाणथळ जागांचे महत्त्व या दुर्मिळ नोंदीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शहराच्या वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अशा नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे किती आवश्यक आहे, याचीही ही घटना जाणीव करून देते. कारण या पाणथळ जागा केवळ पाण्याचे साठे नसून असंख्य पक्ष्यांचे हक्काचे घर आहे. कॅमेऱ्याच्या एका क्लिकमध्ये टिपलेला हा दुर्मिळ पाहुणा केवळ छायाचित्रापुरता मर्यादित नाही, तर नवी मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेची साक्ष देणारा अनमोल ठेवा आहे. निलेश तांडेल यांच्या १७ ते १८ वर्षांच्या पक्षी निरीक्षण प्रवासात लाभलेले हे अनपेक्षित दर्शन आयुष्यभर जपून ठेवावा असा निसर्गाचा अनमोल क्षण ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.