Thane Kasarvadavali Flyover : वर्षभरातच कासारवडवली उड्डाणपुलाला ‘ब्रेक’

खांबाचा तुकडा निखळल्याने तांत्रिक तपासणी; उड्डाणपुलाच्या कामावरच प्रश्नचिन्ह
Kasarvadavali Flyover
Kasarvadavali Flyoverpudhari photo
Published on
Updated on

ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठा गाजावाजा करत उभारण्यात आलेला कासारवडवली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होऊन अवघे वर्ष उलटत नाही तोच बंद करण्याची वेळ आली आहे. पुलाच्या एका खांबाचा तुकडा निखळल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने या पुलाची तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली असून, बुधवारपासून हा पूल अनिश्चित काळासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पाच्या दर्जाबाबत आणि देखभाल व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कासारवडवली परिसर हा घोडबंदर मार्गावरील अत्यंत वर्दळीचा भाग आहे. ठाणे शहरातून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी संख्या या मार्गावर असते. या ठिकाणी होणारी वारंवारची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात आला. ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणारा हा पूल ८ जुलै २०२५ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे कासारवडवली तसेच आनंदनगर परिसरातील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत झाली होती. मात्र, पुलाच्या एका खांबाचा तुकडा निखळल्याची घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पूल बंद करण्याचा निर्णय घेतला.

Kasarvadavali Flyover
Thane Traffic Diversion : गणेश विसर्जन; वाहतुकीत बदल

तांत्रिक पथकाकडून पुलाची पाहणी आणि तपासणी सुरू आहे. नेमका तुकडा का निखळला, बांधकामाच्या गुणवत्तेशी त्याचा संबंध आहे का, संरचनेच्या इतर भागांवर त्याचा परिणाम झाला आहे का, तसेच पूल पुन्हा वाहतुकीसाठी सुरक्षित आहे का, याची उत्तरे तांत्रिक तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहेत. एखादा मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प वाहतुकीस खुला झाल्यानंतर त्याची नियमित तपासणी, देखभाल करणे आवश्यक असते.

विशेषतः दररोज हजारो वाहने धावणाऱ्या उड्डाणपुलाच्या संरचनात्मक सुरक्षिततेकडे सतत लक्ष देणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत उद्घाटनानंतर अवघ्या वर्षभरातच पुलाचा भाग निखळल्याने या प्रकल्पाच्या बांधकामाचा दर्जा, वापरलेली सामग्री व नियमित देखभाल याची चौकशी होणे आवश्यक आहे.

सध्या प्रशासनाने पूल बंद करून तांत्रिक तपासणीला प्राधान्य दिले आहे. हा निर्णय वाहतुकीच्या दृष्टीने त्रासदायक असला तरी पुलाच्या सुरक्षिततेशी तडजोड करता येणार नाही. मात्र, तपासणीचा कालावधी किती असेल, दुरुस्तीची आवश्यकता असल्यास ती कधी पूर्ण होईल व पूल पुन्हा कधी खुला केला जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

पर्यायी व्यवस्था किती सक्षम?

कासारवडवली उड्डाणपूल बंद असला तरी ठाण्याकडून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना याच मार्गाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासनाला पर्यायी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावे लागणार आहे. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत कासारवडवली, आनंदनगर आणि घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक नियोजनाचे मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.

Kasarvadavali Flyover
Fenugreek Price Dropped : मेथीच्या भाजीला कवडीमोल भाव

कोंडीचा फटका कमी

सध्या गणेशोत्सवाचा कालावधी असल्याने शहरातील अनेक नागरिक गावी गेले आहेत. परिणामी रस्त्यांवरील वाहनांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे बुधवारी कासारवडवली उड्डाणपूल बंद केल्यानंतरही वाहतुकीवर त्याचा परिणाम जाणवला नाही. मात्र, गणेशोत्सव संपल्यानंतर नागरिक परतल्यानंतर घोडबंदर मार्गावरील वाहतुकीचा भार पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यावेळी पुलाच्या बंदचा खरा परिणाम प्रशासनासमोर येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news