

ठाणे : ठाणे कर्जत लोकलमध्ये संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी जागा मिळवण्यासाठी प्रवाशांना अक्षरशः जीवाशी खेळ करावा लागत आहे. सायंकाळी 5.21 वाजता कारशेडवरून येणारी कर्जत लोकल ठाणे स्थानकात फलाट उपलब्ध नसल्याने काही अंतरावर थांबवली जाते. परिणामी प्रवाशांना थेट रेल्वे रूळ ओलांडत धावत जाऊन लोकल पकडावी लागत असून, त्यांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
ठाणे रेल्वे स्थानक हे मध्ये रेल्वेच्या अतिशय गर्दीच्या स्थानकांपैकी एक मानले जाते. दररोज आठ ते नऊ लाख प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी ठाणे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होऊन चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होणे तर नेहमीचे झाले आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज 5 वाजून 21 मिनिटांनी ठाणे-कर्जत लोकल सुटते. मात्र स्थानकावरील वाढलेला रेल्वे वाहतूक ताण आणि फलाटांची कमतरता यामुळे ठाणे कारशेडवरून सुटणारी ही लोकल ठाणे स्थानकाच्या नियमित फलाटावर थांबवता येत नाही. परिणामी ही लोकल स्थानकापासून काही अंतर मागे उभी केली जाते.
या वेळेला प्रचंड गर्दी असल्याने अनेक प्रवासी जागा मिळवण्यासाठी थेट 1 नंबर फलाटावरून रेल्वे रूळ ओलांडत पुढे धावत जातात. ये-जा करणाऱ्या गाड्यांचा वेग, गोंधळलेली परिस्थिती आणि संध्याकाळचा अंधार अशी परिस्थिती निर्माण झाल्याने कोणत्याही क्षणी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेस हा मोठा धोका असल्याचे निरीक्षण आहे.
ठाणे-कर्जत दिशेला एकूण 122 शटल लोकल सेवा उपलब्ध आहेत. मात्र संध्याकाळच्या ‘गर्दीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून डाऊन मार्गावर येणाऱ्या लोकल गाड्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे ठाणे स्थानकावर फलाट उपलब्धतेचा तुटवडा भासतो. परिणामी शटल लोकल गाड्यांना विलंब होतो किंवा त्या स्थानकाच्या बाहेरच थांबवल्या जातात. कर्जत लोकल ठाणे कारशेडमधून सुटल्यानंतर फलाट क्रमांक 2 वर आणली जाते; परंतु त्यापूर्वीच प्रवासी थकून भागून जागा मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालून धावपळ करताना दिसतात.
प्रवासी आणि स्थानिक सामाजिक संस्थांनी रेल्वे प्रशासनाकडे या परिस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “रूळ ओलांडून प्रवास करणे ही अत्यंत धोकादायक बाब असून, यामुळे कधीही अपघात होऊ शकतो. प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना करावी,” अशी मागणी जोर धरत आहे.
पीक अवर्समधील वाढलेली गर्दी, अपुरी फलाट क्षमता आणि गोंधळलेले स्थानक व्यवस्थापन यामुळे ठाणे स्थानकाची पायाभूत व्यवस्था ताणली गेली असल्याचे स्पष्ट दिसून येते. आवश्यक ते नियोजन, फलाट व्यवस्थेबाबत सुधारणा आणि प्रवासी सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेस सर्वाधिक प्राधान्य देत परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
रेल्वे सुरक्षा बलाच्या म्हणण्यानुसार प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडून लोकल पकडणे आणि लोकलमधून प्रवास करणे धोक्याचे असते; परंतु प्रवाशांमध्ये जनजागृती करणे अशक्य होते. दर दिवशी बहुतांश प्रवाशांवर रेल्वेचे रूळ ओलांडल्यामुळे कारवाई करण्यात येते. तसेच सगळ्या प्रवाशांवर आर पी एफ ला लक्ष्य ठेवणे काहीसे अवघड होत असते.
रेल्वे पोलीस (आरपीएफ)
क्रॉसिंगसाठी रेल्वे स्थानकापासून दूर अंतरावर अर्धा-पाऊण तास उभी करतात. गर्दीच्या वेळी लोकलमध्ये जागा पकडणे अशक्य असते. त्यामुळे लोकलमध्ये जागा पकडण्यासाठी रूळ ओलांडून जाणे हे जोखमीचे असते.
रेल्वे प्रवासी