

सापाड : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांचा तीव्र विरोध करत भरडी गावातील बाधित ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सोमवारी सकाळपासूनच गावातील शेकडो ग्रामस्थांनी साखळी उपोषणासोबत कामबंद आंदोलनाला सुरुवात केली. गावाचा मुख्य रस्ता, शाळा, आरोग्य केंद्र, बाजारपेठ या दैनंदिन जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाच्या मार्गांवर प्रकल्पाचा मोठा परिणाम होणार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
बुलेट ट्रेनचा मार्ग भरडीसह आजूबाजूच्या गावांच्या सीमारेषेवरून जाणार असल्याने विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा मुख्य मार्गच कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर आहे. दररोज पायी किंवा सायकलने शाळेत जाणारे विद्यार्थी या मार्गाचा एकमेव वापर करतात. तोच मार्ग बंद झाल्यास विद्यार्थ्यांना मोठ्या वळणमार्गे शाळा गाठावी लागणार असून, त्याचा शिक्षणावर, सुरक्षिततेवर आणि वेळेवर गंभीर परिणाम होईल, असा आरोप पालकांनी केला आहे.
प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी प्रशासन आणि बुलेट ट्रेन प्रकल्प अधिकाऱ्यांकडे भुयारी मार्गासाठी वारंवार मागणी केली होती. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेले. ‘रोजच्या वापराचा मुख्य मार्ग बंद करून आमचे आयुष्य ठप्प करणार असाल, तर आम्ही कसे गप्प बसू?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी आंदोलनस्थळी उपस्थित अधिकाऱ्यांना केला. केवळ विद्यार्थ्यांचा रस्ता नव्हे, तर आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, दवाखाने, तसेच बाजारपेठेत जाण्यासाठी ग्रामस्थ वापरत असलेला मार्गदेखील या प्रकल्पामुळे अडथळ्यात येत आहे.
एखाद्या व्यक्तीला अचानक आजारपण आल्यास किंवा गर्भवती महिलेला तत्काळ आरोग्य केंद्रात दाखल करायचे असल्यास त्यांना चार-पाच किलोमीटरचा लांब फेरा घ्यावा लागेल. यामुळे जीवितासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी घेतलेल्या कामबंद आंदोलनामुळे भरडी आणि आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुकाने, कार्यालये, शाळा, तसेच वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात ठप्प झाली आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत गावठाणात ‘साखळी उपोषण’ सुरू केले आहे. गावातील महिलाही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या असून, त्यांनी प्रकल्प प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
“बुलेट ट्रेनची गती आमच्या डोक्यावरून जाईल, पण आमचे आयुष्य मात्र ठप्प होईल. प्रशासन आमच्या मागण्यांकडे केराची टोपली दाखवत आहे. विकासाच्या नावाखाली आमच्यावर अन्याय होणार असेल, तर आम्ही लढा उभा करू,” असा संतप्त पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, गाव समितीचे सदस्य आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही ग्रामस्थांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे. भरडीसह आजूबाजूच्या गावाच्या विद्यार्थ्यांचा रस्ता हा जीवनवाहिनी आहे. तीच बंद झाली, तर गावाच्या विकासाला मागे नेणारे पाऊल ठरेल. भुयारी मार्ग देण्याचा निर्णय प्रशासनाने तत्काळ घ्यावा, अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी बैठकीत घेतली आहे.
साखळी उपोषण सुरू असताना प्रकल्प प्रशासनाचे अधिकारी आंदोलनस्थळी येण्याची ग्रामस्थांना अपेक्षा होती. मात्र दुपारपर्यंत कोणतेही आश्वासन ग्रामस्थांना न मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा संताप उसळला आहे.
आंदोलनाकडे जिल्ह्याचे लक्ष
प्रशासन आणि प्रकल्प अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नसून, आंदोलन किती वाढेल आणि परिस्थिती कुठपर्यंत जाईल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हे आंदोलन सरपंच विलास पाटील, उपसरपंच संगीता पाटील, मनसे तालुकाध्यक्ष आकाश दिनकर, विजय भोईर, दिनेश पाटील, प्यारेलाल पाटील, लालचंद पाटील, रवीना पाटील, सुनिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले आहे.
सुरक्षा व्यवस्थाही वाढवली
या आंदोलनामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामातही मोठा अडथळा निर्माण झाला आहे. प्रकल्पाच्या साइटवरील कामगारांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव काम बंद केले आहे. सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. ग्रामस्थांनी त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान भुयारी मार्ग हा आमचा हक्क आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून कोणताही विकास होऊ शकत नाही, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.