

ठाणे : कल्याण, ठाणे ते लातुर अंतर 10-11 तासांऐवजी केवळ चार तासात पार करता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कल्याण-लातूर द्रुतगती महामार्ग प्रस्तावित केला आहे. सध्यातरी हा 442 किमी लांबीचा महामार्ग कागदावरच आहे. पण आता या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नागपूरमध्ये एमएसआरडीसीच्या प्रकल्पांच्या आढावा बैठकीत कल्याण-लातूर द्रुतगती महामार्गाला तत्वत: मंजुरी दिली. त्यानुसार आता एमएसआरडीसीकडून या प्रकल्पासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर सविस्तर प्रकल्प आराखड्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
एमएसआरडीसी राज्यभरात 4217 किमी लांबीच्या रस्त्यांची उभारणी करणार आहे. याच रस्त्यांच्या प्रकल्पाअंतर्गत एमएसआरडीसीने कल्याण- लातूर द्रुतगती महामार्ग प्रस्तावित केला आहे. नागपूरमध्ये मंगळवारी प्रकल्पांचे एक सादरीकरणही करण्यात आले. त्यात कल्याण-लातूर महामार्गाविषयीचीही माहिती देण्यात आली.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पास तत्वत: मंजुरी दिल्याची माहिती दिल्याचे समजते. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला असून आता प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. राज्य मंत्रिमंडळाची या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या सविस्तर आराखड्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. या सर्व कामांसाठी एक ते दीड वर्षांचा कालावधी लागेल. त्यामुळे येत्या दीड वर्षात कल्याण-लातूर महामार्गाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.