

डोंबिवली: कल्याण पूर्वेकडील रेल्वे स्थानकावर असलेला स्कायवॉक पादचाऱ्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आला असला तरी, सद्या तो वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. कोळसेवाडी ते रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या या स्कायवॉकवर एका तरूणाने चक्क स्कूटर चालविल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे प्रवाशांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षेसह कोळसेवाडी ते तिकीट खिडकी अशा एकूण अंतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या संदर्भात प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरूणाने डबलसीट घेऊन कोळसेवाडीकडील स्कायवॉकवर स्कूटर चढवली. त्यानंतर गर्दीतून वाट काढत त्याने ही स्कूटर थेट रेल्वे स्थानकाजवळील तिकीट खिडकीपर्यंत आणली. स्कायवॉकवर अचानक स्कूटर पाहून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. हा प्रकार केवळ नियमबाह्य नसून अत्यंत धोकादायक असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
काहींच्या मते स्कायवॉक हा फक्त पादचाऱ्यांसाठी आहे. जर अशाच प्रकारे दुचाक्या स्कायवॉकवर येऊ लागल्या, तर लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना मोठा अपघात होऊ शकतो. प्रशासनाने अशा बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
दुसरीकडे काही प्रवाशांनी वेगळीच व्यथा मांडली आहे. कोळसेवाडी ते तिकीट खिडकी हे अंतर खूप जास्त आहे. कडक उन्हाळ्यात हे अंतर चालताना प्रवाशांच्या जीवाची लाहीलाही होते. त्यामुळे दुचाक्या थेट स्थानकापर्यंत नेण्यासाठी काही कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था असावी, असे मत काही स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
प्रशासनापुढे आव्हान: स्कायवॉकवर दुचाकी येणे ही रेल्वे सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेतील मोठी त्रुटी मानली जात आहे. स्कायवॉकवर दुचाकी आणण्याच्या घटना रोखण्यासाठी स्कायवॉकच्या प्रवेशद्वारावर लोखंडी अडथळे बसविण्याची गरज असल्याचे मत प्रवाशांसह पादचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्याचबरोबर अंतर कमी करण्यासाठी वाहने पुढे नेता येतील, अशीही व्यवस्था करण्याची काही प्रवासी आणि पादचाऱ्यांची आग्रही मागणी आहे.