

सापाड : ऐन दिवाळीत कल्याण पश्चिमेत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना येथील नागरिकांना पाण्यासाठी रोज वणवण करावी लागत आहे.
यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला, धरणे आणि नद्यांचे जलस्तर समाधानकारक पातळीवर आहेत. तरीही कल्याण पश्चिम परिसरात, विशेषतः गांधारी विभागात, नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
गेल्या महिन्याभरापासून गांधारी परिसरातील अनेक उंच इमारती, गृहनिर्माण संकुले आणि वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा अत्यंत विस्कळीत झाला आहे. नागरिकांना दिवसातून फक्त काही मिनिटांसाठी पाणी मिळते, तेही अत्यल्प दाबाने. परिणामी अनेक संकुलांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. दररोज टँकरचे पाणी खरेदी करण्यामुळे नागरिकांवर आर्थिक ताण वाढला असून टँकरवाल्यांकडून पाण्याचे दर मनमानी पद्धतीने आकारले जात आहेत.
पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून, तीव्र संतापही व्यक्त केला जात आहे. गांधारी परिसरातील रहिवाशांनी अनेकवेळा लेखी तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
यावर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने कल्याण-डोंबिवली परिसराला पाणीपुरवठा करणारी धरणे भरलेली आहेत. तरीदेखील पाण्याचा अभावामुळे हा प्रश्न निर्माण होणे हे नियोजनातील त्रुटीचे लक्षण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येला अनुरूप पाणीपुरवठा योजनेत बदल करण्यात आले नाहीत, तसेच वितरण व्यवस्था सुधारली गेली नाही, अशी टीका नागरिकांमधून होत आहे. विशेष म्हणजे गांधारी परिसरातील मोठ्या संकुलात गेल्या महिन्याभरापासून पाण्याची भीषण समस्या आहे. रहिवाशांच्या मते, या संकुलातील एका इमारतींमध्ये साडेसात एचपी क्षमतेचे मोठे पंप बसवले गेले आहेत, जे प्रचंड प्रमाणात पाणी खेचून घेतात. त्यामुळे परिसरातील इतर इमारतींना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही.
स्थानिकांनी या संदर्भात अनेकवेळा संबंधित विभागाकडे तक्रारी दाखल केल्या, मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान जेव्हा याबाबतच्या तक्रारी नागरिकांकडून लेखी स्वरूपात सादर केल्या गेल्या आणि पंपद्वारे पाणी खेचल्याचे ठोस पुरावेही दिले गेले आहेत, तरीही त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही?
दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात लोकांना घर सजवायचे, पाहुण्यांचे स्वागत करायचे असते. मात्र, पाण्याअभावी नागरिकांना दिवाळीच्या तयारीऐवजी बादल्या आणि टँकर्सच्या रांगा लावाव्या लागत आहेत. गेले सहा महिने पावसाने हजेरी लावूनही या पाणीटंचाईचे संकट घोंगावू लागल्याने येथील नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. यावर त्वरिक उपाययोजना आखण्यात याव्यात व येथील पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
पाण्यासाठी रांगा
महिलांना सकाळपासून पाण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते, तर वृद्ध आणि मुलांना पाण्याच्या टंचाईमुळे प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. कल्याण शहरातील झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचा आणि बांधकाम व्यवसायाचा विचार करता, पाणीपुरवठा नियोजन अधिक कार्यक्षम असणे अपेक्षित होते. परंतु संबंधित विभागाने दीर्घकालीन उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले. “धरणात पाणी असूनही नळात पाणी नाही” ही परिस्थिती अपयशाचे स्पष्ट चित्र आहे. गांधारी परिसरातील रहिवाशांनी आता या संपूर्ण प्रकरणावर राज्य शासनाकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण स्थानिक प्रशासनाकडून न्याय मिळण्याची आशा त्यांनी सोडली आहे.
दोषींवर कारवाई करावी
पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून, त्यावर ऐन सणासुदीच्या काळामध्ये अंकुश येऊ नये, अशी मागणी ते नागरिक करत आहेत. महापालिकेने तातडीने गांधारी परिसरातील पाणीपुरवठा यंत्रणा तपासून पंपाद्वारे बेकायदेशीर पाणी खेचणे थांबवावे, नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. दिवाळीच्या तोंडावर कल्याणकरांना “पाणी टंचाईचा दिवाळी फराळ” मिळत असताना, धरणात पाणी आहे, मग आमच्या घरात पाणी का नाही, असा प्रश्न शहरातील नागरिक विचारत आहेत.