

रायगड ः जयंत धुळप
राज्यातून नैऋत्य मोसमी पावसाने (मान्सून) जवळपास माघार घेतली असली तरी, पुन्हा एकदा पावसाच्या पुनरागमनाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या पूर्वेकडील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आणि आज (दि. 15) दुपारनंतर रायगडमध्ये पावसाला सुरुवात झाली.
आपल्या शेतातील कापणीला आलेले तयार भात वाचवण्याकरिता शेतकऱ्यांनी आज सकाळ पासून अगदी युद्ध पातळीवर भात कापणी करुन घेतल्याचे पवेळ खंडाळा येथील तरुण शेतकरी दिनेश सोडवे यांनी दैनिक पुढारी शी बोलताना सांगीतले.
पावसापासून तयार भात वाचवण्याच्या या युद्धपातळीवरील भात कापणी करिता घरातील सदस्य कमी पडणार याचा विचार करुन 200 रुपये रोजाने 8 मजूर घेतल्यामुळे आमच्या शेतातील भात कापणी दुपारी पावसापूर्वी पूर्ण झाल्याने काही भात आम्ही वाचवू शकलो. मात्र अनेकांना मजूर मिळाले नाहीत. आणि घरातील सदस्यांची संख्या कमी असल्याने भात कापणी करता आली नाही. परिणामी अनेकांच्या शेतातील तयार उभे भात संध्याकाळी आलेल्या पावासात भिजून त्यांचे नुकासान झाले असल्याचे सोडवे यांनी पूढे सांगीतले.
दरम्यान रायगड जिल्ह्यात अलिबाग आणि रोहा तालुक्यांत बुधवारी संध्याकाळी जोरदार हजेरी लावली तर उर्वरित जिल्ह्यात तुरळक प्रमाणात पाऊस झाला आहे.पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता.
दिवाळीच्या तोंडावरच पावसाची हजेरी
दिवाळी सण अवघ्या आठवडाभरावर आला असतानाच आता सुद्धा पावसाने हजेरी लावालया सुरुवात केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.याचा मोठा फटका फटाका व्यावसायिकांना बसत आहे.दिवाळीसाठी अनेकजणांनी मोठे स्टॉलउभारले आहेत.त्यांना या पावसाचा त्रास जाणवत आणहे.