

डोंबिवली : कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यातील हवालदार सतीश सोनवणे यांच्या सतर्कतेमुळे कल्याण रेल्वे स्थानकातून सोमवारी रात्री अपहरण केलेल्या बाळाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या बाळाचा शोध अवघ्या सहा तासांच्या आत घेण्यात आला आहे. या बाळाचे अपहरण करणाऱ्या आत्या आणि तिच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दाखल तक्रारीप्रमाणे बाळाच्या चोरीच व्हिडिओ समाज माध्यमांत प्रसारित केला होता. या व्हिडीओच्या आधारे महात्मा फुले चौक पोलिसांनी तपास चक्रांना वेग देऊन अपहृत बाळ त्याच्या माता/पित्याच्या स्वाधीन केले.
या संदर्भात सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी ही माहिती दिली. पुणे येथील निलेश आणि त्यांची पत्नी पूनम कुंचे हे कष्टकरी कुटुंब मोलमजुरीच्या निमित्ताने कल्याणमध्ये आले आहे. कल्याणात फिरून दिवसभर मजुरी करून हे दाम्पत्य उपजीविका करतात. राहण्यास जागा नाही. त्यात पाऊस सुरू असल्याने हे दाम्पत्य आपल्या आठ महिन्यांच्या बाळासह रात्रीच्या सुमारास कल्याणच्या रेल्वे स्थानकातील एका आडोशाला मुक्काम करते.
सोमवारी दिवसभर मजुरीचे काम करून हे दाम्पत्य रेल्वे स्थानक परिसरात विश्रांतीसाठी आले. मध्यरात्रीच्या सुमारास गाढ झोपेत असताना या दाम्पत्याजवळ असलेले आठ महिन्यांचे बाळ एका तरूणाने उचलून नेले. सकाळी या दाम्पत्याला जाग आली तेव्हा त्यांना आपले बाळ गायब असल्याचे आढळून आले. कुशीत झोपलेले बाळ गायब झाल्याचे लक्षात येताच आई पूनम हिने हंबरडा फोडला. या महिलेचा हंबरडा पाहून इतर महिला प्रवाशांना गहिवरून आले.
जागरूक प्रवाशांनी या दाम्पत्याला कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सहकार्य केले. अपहृत बाळाचे वडील निलेश कुंचे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी ज्या ठिकाणाहून बाळ चोरीला गेले त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज चित्रण तपासले. मध्यरात्रीच्या सुमारास एक तरूण चोरपावलांनी आला आणि त्याने कुंचे दाम्पत्य झोपलेल्या फलाटावरील ठिकाणी येऊन बाळाला चोरून नेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हा व्हिडिओ समाज माध्यमांसह पोलिसांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर प्रसारित केला.
हा व्हिडिओ महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यातील हवालदार सतीश सोनवणे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बाळाला चोरून नेणारा इसम परिचित असल्याचे, तसेच त्याचा एका भांडण प्रकरणाशी संबंधाने रात्री महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात आला असल्याचे आढळले. हवालदार सतीश सोनवणे यांनी ही बाब वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण परदेशी यांना सांगितली. त्यानंतर अपहृत बाळाचा शोध घेण्यासाठी दोन तपास पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना करण्यात आली.
पोलिस डायरीतील नोंदीवरून काढला माग
पोलिस ठाण्यात रात्री दाखल झालेल्या भांडणाच्या गुन्ह्यातील पत्त्यावर एक पथक गेले, तर अन्य भागात दुसरे पथक बाळाचा शोध घेत होते. एका पथकाने पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यातील पत्त्याच्या घरावर छापा टाकला. यावेळी अक्षय खरे आणि त्याची आत्या सविता खरे यांच्या ताब्यात कल्याण रेल्वे स्थानकातून अपहरण केलेले बाळ आढळले. पोलिसांनी बाळाचा ताबा घेऊन अक्षय आणि त्याची आत्या सविता खरे यांना पोलिस ठाण्यात आणले. महात्मा फुले चौक पोलिसांनी हे बाळ लोहमार्ग पोलिसांच्या माध्यमातून सुखरूपपणे बाळाच्या आईच्या ताब्यात दिल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त घेटे यांनी सांगितले. अक्षय आणि त्याची आत्या सविताने या बाळाचे कशासाठी अपहरण केले होते या दिशेने पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.