Kalyan-Shil highway Accident | कल्याण-शिळ महामार्गावर हृदयद्रावक घटना

भरधाव ट्रकखाली चिरडून २.५ वर्षीय बालकाचा मृत्यू; मानपाडा पोलिसांकडून फरार ड्रायव्हरचा शोध सुरू
Kalyan-Shil highway Accident
हाच तो रेती/कचने भरलेला महाकाय हायवा, ज्याच्या खाली चिरडून निरागस कविश गतप्राण झाला. (Pudhari File Photo)
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावर सद्या मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. परिणामी हा महामार्गार आक्रसल्यामुळे वारंवार लहान-मोठ्या अपघातांच्या घटना घडत आहेत. शनिवारी रात्रीच्या सुमारास या महामार्गावरील सोनारपाडा गावाच्या समोर काळजाचा ठोका चुकविणारी हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगात चाललेल्या हायवेवरील ट्रकखाली चिरडून २.५ वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी हायवा ताब्यात घेऊन फरार ड्रायव्हरचा शोध सुरू केला आहे.

कु. कविश जयंत झांबरे (वय २ वर्षे ५ महिने) असे निरागस बालकाचे नाव असून तो आपल्या माता-पित्यासह डोंबिवली जवळच्या नांदिवली टेकडीवरील नांदिवली हेल्थ व्ह्यू सोसायटीत राहत होता. या प्रकरणी दुर्दैवी कविशचे वडील जयंत भगवान झांबरे (३६) यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६ (१), २८१ सह मोटार वाहतूक कायद्याचे कलम १८४ अन्वये हायवाच्या फरार ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kalyan-Shil highway Accident
Dombivali Crime | ‘१५ पेट्या टाक...नाहीतर ढगात पाठवीन’

या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कविशचे वडील जयंत झांबरे हे खाजगी ठिकाणी नोकरी करतात. शनिवारी रात्री आठच्या सुमारास कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या गोळवली येथील पंपावर पेट्रोल भरून जयंत झांबरे हे त्यांच्या एम एच ०५/जी बी/ ६६७० क्रमांकाच्या बुलेटवरून घराकडे चालले होते. यावेळी त्यांचा मुलगा कविश हा पाठीमागे बसला होता. ८.३० वाजण्याच्या सुमारास सोनारपाड्यासमोरील डीएनएस बँक चौकात येताच वाहतूक नियमांचे उल्लंघन करून भरधाव वेगात चाललेल्या एम एच १९/ सी वाय /२००६ क्रमांकाच्या हायवा ट्रकने पाठीमागून बुलेटला जोरात ठोकर दिली. त्यामुळे जयंत यांच्या मागे बुलेटवर बसलेला कविश रस्त्यावर पडला आणि ट्रकच्या पुढील चाकाखाली येऊन जागीच गतप्राण झाला.

भरचौकात अपघात घडल्याने मोठी गर्दी जमली होती. निरागस बालकाच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरातील वातावरण क्षणार्धात तापले. त्यामुळे जमावाकडून यथेच्छ मार पडण्याच्या भितीमुळे ड्रायव्हरने ट्रक तेथेच सोडून पळ काढला. या चौकातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या चौकीतील पोलिसांनी वाहतुकीची कोंडी हटविली. मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केल्यानंतर बालकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयाकडे पाठवून दिला. त्यानंतर रेती/कचने भरलेला महाकाय हायवा पोलिसांनी जप्त केला. एकीकडे या घटनेनंतर कविश राहत असलेल्या नांदिवली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे निरागस कविशच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरार ट्रक ड्रायव्हरचा सहाय्यक पोलिस निरीक्षक देवीदास ढोले आणि त्यांचे सहकारी शोध घेत आहेत.

Kalyan-Shil highway Accident
Dombivali Crime | ‘१५ पेट्या टाक...नाहीतर ढगात पाठवीन’

कल्याण-शिळ महामार्गावरील मृत्यूचे तांडव थांबणार कधी ?

कल्याण-शिळ महामार्गावर यापूर्वी अपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये रहदारीचा अडथळा, वाहतूक कोंडी, भरधाव वेगात वाहने चालवणे आणि रस्त्यांची अपुरी अवस्था यांसारख्या कारणांमुळे दुर्दैवी घटना घडत आहेत. सप्टेंबर महिन्यात कंटेनरखाली चिरडून दोघा स्कूटरस्वारांना जीव गमवावा लागला. एमएसआरडीसीने रस्त्यावर नवीन दुभाजक बसवल्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती, ज्यामुळे प्रवासी ४ ते ५ तास अडकून पडले होते. हे वारंवार घडत असते. मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्याने हा महामार्ग जागोजागी आक्रसला आहे. परिणामी या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वारंवार लक्ष वेधूनही उदासीन शासन/प्रशासनाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे निरागस कविश सारखे आणखी किती बळी घेणार ? असा सवाल माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news