

डोंबिवली : कल्याणच्या स्टेशन परिसरात दोघांनी खिशातून सिगारेट काढून टपरी चालकाकडे माचिस मागितली. टपरी चालकाने माचिस देण्यास नकार दिल्याने संतप्त दोघा कथित भाईंनी कमरेला खोचलेला कोयता काढून दहशत माजवली. हातातील कोयता पाहून साऱ्यांची पळता भुई थोडी झाली. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांना गजाआड केले. महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाज माध्यमांवर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हिडिओमध्ये दोन तरूण दिसत आहेत. दोघांपैकी एक जण लोकांना शिवीगाळ करताना दिसत आहे. तर दुसरा हातात कोयता घेऊन उभा आहे. आमच्या नादाला लागू नका, एकेकाला खल्लास करून टाकेन, अशा धमक्या देणाऱ्या या कथित भाईंचा कारनामा एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. वरिष्ठ पोलिस निरिक्षक बाळकृष्ण परदेशी यांनी तपासासाठी पथके तयार केली. पोलिसांनी दोघांचा शोध घेतला. मध्यरात्रीच्या सुमारास हातात कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या त्या दोन्ही कथित भाईंना बेड्या ठोकून गजाआड केले. निलेश शेलार आणि मेघनाथ भंडारी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील राहणारे आहेत. या घटनेचा ट्रॅक रेकॉर्ड आहे का ? याचा चौकस तपास पोलिस करत आहे.