Open Party Ban Kalyan
डोंबिवली : पावसाच्या थंडगार मोसमात उघड्यावर ओल्या पार्ट्या झोडण्याची मजाच काही वेगळी असते. मात्र कल्याणकर पोलिसांनी एका कारवाईतून अशा पार्ट्या झोडणार्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे पावसाचा आनंंद लुटण्यासाठी मोकळ्या मैदानात, झाडा-झुडपांचा आधार घेऊन सार्वजनिक ठिकाणी दारूच्या पार्ट्या झोडणार्या, तसेच दारू ढोसून गोंधळ घालत शांंततेच्या भंग करणार्या 44 तरुणांंवर कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी रविवारी रात्री कारवाई केली.
या तरुणांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा, तसेच दारूबंदी कायद्यान्वये कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे कल्याण पूर्वेतील अनेक तरुण दारूच्या बाटल्या घेऊन सार्वजनिक ठिकाणची मैदाने, उद्याने, बगिचे, झाड-झुडपांचा आधार घेऊन दारूच्या पार्ट्या करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून कुणीही गोंधळ घालत असेल, शांततेचा भंग करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी आदेश दिले आहेत. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली चार-पाच वेगवेगळ्या पथकांनी कोळसेवाडी, काटेमानिवली, विजयनगर, चिंचपाडा, आदी परिसरात रविवारी रात्री शोध मोहीम हाती घेतली होती.
सार्वजनिक ठिकाणी दारूच्या पार्ट्या करण्यास बसलेल्या, तसेच दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा करणार्या, झाडा-झुडपांचा आधार घेऊन काळोखामध्ये दारू पित बसलेल्या तरुणांच्या टोळक्यांना या पथकांनी ताब्यात घेतले. पोलिसांना पाहताच काहींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तथापी पोलिसांनी धरपकड करून या तरुणांना पोलीस ठाण्यात आणले.
यापूर्वी उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्व भागातून दररोज 15 ते 20 मद्यपींना पकडून पोलीस ठाण्यात आणून प्रसाद दिला जात असे. तेव्हापासून कल्याण पूर्वेतील सार्वजनिक ठिकाणचे दारू अड्डे बंद झालेे. हे अड्डे पाऊस सुरू झाल्यानंतर पुन्हा सुरू झाल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी कारवाईला वेग दिला.