

Campaign against illegal constructions in Kalyan-Dombivli
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने बेकायदा बांधकामांच्या विरोधात आक्रमक पावित्रा घेतला आहे. गेल्या दोन दिवसांत बैठ्या चाळींपासून बहुमजली इमारतींवर पाडकामाच्या कारवाईच्या वेग दिला आहे.
1/अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी टिटवाळ्यातील कल्याण वळण मार्गावर काळू नदीशेजारील 2 खोल्यांचे बांधकाम व 10 फाऊडेंशनवर निष्कासनाची कारवाई केली. 3/क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी कल्याण पश्चिमेकडील पाठारे नर्सरी जवळ डॉ. आंबेडकर रोडला असलेल्या बांधकामधारक तनजीप कांबळे यांच्या 10 खोल्यांच्या लोडबेरींग बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली. केडीएमसीच्या ग प्रभागांतर्गत असलेल्या डोंबिवली जवळच्या आयरे गावात गटार व नाल्याच्या साफसफाई संदर्भात प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी निरीक्षण व पाहणी केली.
पाहणीदरम्यान या परिसरात बेकायदा चाळी बांधल्याचे आढळून आले. तेथे 15 जोत्यांचे (फाऊंडेशन) बांधकाम व 5 पूर्ण झालेल्या खोल्यांचे बांधकाम निदर्शनास आले. सदर बांधकाम सार्वजनिक गटार व नाल्यावर अतिक्रमण करून करण्यात आले होते. त्यामुळे ग प्रभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे जोते आणि खोल्यांवर कारवाई करून नाले, गटा मुक्त करण्यात आले. कोणत्याही प्रकारचे बेकायदा बांधकाम वा अतिक्रमण सहन केले जाणार नाही. अशा बांधकामांवर कठोर पावले उचलली जातील, असा इशारा सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कारवाई दरम्यान भूमाफियांना दिला.
कल्याण पूर्वेकडील आय प्रभागात असलेल्या माणेरे गावात रखडलेल्या रस्ता रूंदीकरणासह गटार बांधणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामात आलेल्या अडथळ्यांवर कारवाई करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून आय प्रभागात रस्त्याचे रुंदीकरण आणि गटार बांधणीचे काम रखडले होते. अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे व उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कामास सुरुवात करण्यात आली.
निष्कासन कारवाईनंतर रस्ता रुंदीकरण व गटार बांधणीचे काम तत्काळ सुरू करण्यात आले. स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या भागात रेडियम पट्ट्या व डेंजर अशी चिन्हे लावण्यात आली आहेत. महापालिकेने केलेल्या तातडीच्या आणि ठोस कारवाईमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेले महत्त्वाचे काम मार्गी लागले आहे. लवकरच परिसरातील रहिवाशांना सुधारित रस्ता मिळणार आहे. शिवाय सांडपाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे.