Kalyan Hit and Run: कल्याणमध्ये हिट अँड रनच्या दोन घटना; ७५ वर्षीय वृद्धासह १८ वर्षीय तरुण गंभीर जखमी

भरधाव कार आणि रिक्षाची पादचाऱ्यांना धडक; जखमींना मदत न करताच चालक पसार, खडकपाडा पोलिसांकडून शोध सुरू.
accident mk96
accidentFile Photo
Published on: 
Updated on: 

डोंबिवली: कल्याण शहरात हिट अँड रनच्या दोन भीषण घटना घडल्या असून भरधाव वाहनांनी दिलेल्या जोरदार धडकेत ७५ वर्षीय वृद्ध आणि १८ वर्षीय तरुण अशा दोन पादचाऱ्यांना गंभीर जखमी केले आहे.

अपघातानंतर दोन्ही वाहनांचे चालक जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पसार झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे नोंदवून फरार चालकांचा शोध घेण्यासाठी तपास चक्रांना वेग दिला आहे.

accident mk96
Gold Sweet: सोन्याचा वर्ख असलेल्या मिठाईची दिवाळीत खास क्रेझ; आठ तुकड्यांची किंमत तब्बल दहा हजार

पहिल्या घटनेत बुधवारी सकाळच्या सुमारास खडकपाडा परिसरातील रमेश बाळा चव्हाण (७५) हे आपल्या नातीला शाळेच्या बसमध्ये सोडल्यानंतर झुलेलाल चौकातून दूध घेऊन घराकडे परतत होते.

इतक्यात पाठीमागून भरधाव वेगात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. अपघातानंतर चालकाने मानवतेचे भान न ठेवता गाडी न थांबवता तेथून पसार झाला.

या अपघातात चव्हाण आजोबांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तेथे त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक रूपाली दांगट फरार वाहन चालकाचा शोध घेत आहेत.

दुसऱ्या घटनेत दुर्गाडी किल्ल्यानजीक असलेल्या गणेश घाट परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मुज्जमीत जफर खान (१८) हा तरुण त्याच्या मित्रांसोबत फिरत होता. गणेश घाटाकडून कल्याण-भिवंडी उड्डाणपुलाच्या दिशेने चालत जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने मुज्जमीतला जोरदार धडक दिली.

accident mk96
Torrent Power Project: सायडोंगर वाचवण्यासाठी महाराष्ट्र एकवटला; टोरेन्ट प्रकल्प रद्द करण्याची मागणी

रिक्षाचे चाक पायावरून गेल्याने त्याच्या डाव्या पायास गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर रिक्षावाल्याने न थांबवता तेथून पळ काढला. मित्रांनी प्रसंगावधान राखून रिक्षाचा फोटो काढला आणि मुज्जमीतला तातडीने रुग्णालयात दाखल केले

फरार रिक्षावाल्याचा शोध सुरू

याप्रकरणी पोलीस हवालदार अल्पेश सोनवणे आणि त्यांचे सहकारी फरार रिक्षावाल्याचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप तो सापडला नसल्याने अशा बेदरकार रिक्षावाल्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी सर्वच स्तरांतून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.