Kalyan heavy rain : कल्याणात पावसाचा कहर; अनेक वस्त्यांमध्ये पाणी

बल्ल्यानीत रस्त्यावर भगदाड, रस्ते खचले; मोहिली जलशुद्धीकरण केद्द पाण्याखाली
Kalyan heavy rain
Kalyan heavy rainpudhari photo
Published on
Updated on

कल्याण : सतीश तांबे

गेली तीन दिवस धुंवाधार पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली, टिटवाळा आदी शहरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उंचसखल भागातील चाळी तसेच रस्त्यावर पाणी भरल्याने नदीचे स्वरूप आले तर आंबिवली नजिकच्या उल्हास नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाल्याने नदी दुधडी भरून वाहू लागल्याने नदी लगतच असलेल्या केडीएमसीच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरल्याने पाण्या खाली गेले आहे.

या जलशुद्धीकरण केंद्रातून टिटवाळा, अ प्रभाग व कल्याण पश्चिमे कडील काही भागासह कल्याण (पश्चिम) विभागातील काही भाग उदा.शहाड, भोईरवाडी, रामबाग, चिकणघर, घोलपनगर, मिलींदनगर, योगीधाम, मुरबाड रोड, रामबाग जोशी बाग, बिर्ला कॉलेज ते खडकपाडा चौक या परिसराचा तसेच संपूर्ण अ प्रभागातील आणि अशोकनगर वालधुनी, शिवाजीनगर वालधुनी या परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर पाणी पुरवठा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश डावरे यांनी दिली.

Kalyan heavy rain
Kalyan-Dombivli Heavy rain: महापुराचा धोका! उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी; २०० हून अधिक लोकांचे तातडीने स्थलांतर

कल्याण पूर्वेतील खडेगोळवली, विजयनगर आमराई आणि १०० फूटी रस्त्यावरील बौद्ध विहारानजीकच्या सखल भागात पावसाचे पाणी साचले. या भागातील नागरीकांना घरे खाली करण्यास कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र नागरीकांनी पाणी निचरा होण्याची वाट पाहिली. मात्र महापालिकेच्या वतीने त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था सूर्या, जाईबाई आणि मातोश्री या शाळेत करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी दिली आहे.

कल्याण पूर्वेतील जे प्रभागातील एक जुने घर पावसामुळे पडले. या घटनेत शांताबाई गांगुर्डे ही महिला जखमी झाली. तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याने दिली.

आंबिवली टिटवाळा मार्गावरील मुंबई वडोदरा महामार्गा जवळील बल्याणी येथील नाल्यावरील रस्ता खचल्याने रस्त्याला भगदाड पडल्याने या रस्त्यावरील टिटवाळा कडे जाणारी व टिटवाळाहून कल्याणच्या दिशेने येणारी वाहतूक सोमवारी दुपारी दोन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत बंद करण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक मोहिली मानिवली मार्गे घोटसई ते टिटवाळा मार्गे वळविण्यात आली आहे.

दुसरा पर्यायी मार्ग बल्याणीतून उंभर्णीकडे जाणाऱ्या रस्त्याकडून, पाण्याच्या टाकीकडून जो दुसरा अंडरपास आहे. त्याच्या खालून पुन्हा याच रोडवर येणे हा आहे. हे दोन्ही मार्ग आता सध्या खुले आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शिंदे सेनेचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी केली आहे.

गेली तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे प्रवासी संख्या घटल्याने त्याचा फटका एसटी व पालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसवर झाला. कल्याण तालुक्यातील तसेच कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मुरबाड आदी शहरातील रस्त्यावर जागोजागी पावसाचे पाणी साचल्याने बस वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहतूक कोंडीत सापडण्या पेक्षा प्रवाशी वर्गाने घरातून बाहेर पडणे टाळल्याने त्याचा परिणाम एसटी व परिवहन उपक्रमाच्या प्रवाशी वाहतूक सेवांवर झाल्याने बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे दोन दिवसात पाच लाखाचा फटका डेपोला बसला आहे. डेपाचे पाच लाखाचे उत्पन्न पावसाच्या पाण्यात बुडाले आहे.

Kalyan heavy rain
वालधुनी नदी प्रदूषणाची शासनाकडून दखल; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

एसटी डेपोचे व्यवस्थापक चेतन देवधर यांनी सांगितले की, दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाचा फटका डेपोला बसला आहे. डेपो व्यवस्थापनाला ५ जुलै रोजी ३२ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या तर ६ जुलै राेजी २८फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. डेपोचे दैनंदिन उत्पन्न ८ ते १० लाख रुपये आहे.

प्रवासी संख्या घटल्याने आणि फेऱ्या रद्द झाल्याने प्रति दिवसाला अडीच लाख या प्रमाणे दोन दिवसात पाच लाख रुपयांनी उत्पन्न घटले आहे. पावसात आवश्यकता असल्याशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे. त्यामुळे प्रवासी बाहेर पडत नाही. विशेषत: मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहे.

आढावा घेण्यासाठी महापौर अलर्ट

कल्याण पश्चिमेतील आंबिवली परिसरात कल्याण डाेंबिवलीच्या महापौर हर्षाली चौधरी यांनी पाहणी केली. त्याठइकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने करण्याचे आदेश महापालिकेच्या आपतकालीन विभागाला दिले आहेत. उपमहापौर राहूल दामले यांनी महापालिका मुख्यालयातील इन्टीग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटरमध्ये जाऊन संपूर्ण शहरातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. दोन ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी साचले असून तो भाग खाडी किनारी असल्याने भरतीच्या वेळी नागरीकांना स्थलांतरीत करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला केली.

उल्हास नदीच्या पुलावर स्टंटबाजी

कल्याण मुरबाड रोडवरील उल्हास नदीवर रायते येथे नव्याने पूल उभारण्यात आला आहे. आज सकाळी उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असताना एका तरुणाने पुलाच्या कठड्यावर उभे राहून जीवघेणी स्टंटबाजी केली. याच ठिकाणी असलेलाय जुना राहते पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर रुंदे गावाकडे जाणारा आणि जू गावाकडे जाणारा वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news