

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, उल्हासनगर व कल्याण या प्रमुख शहरांमधून वाहणाऱ्या वालधूनी नदीच्या पाण्याचा रंग अलीकडे रंगीबेरंगी होत आहे. नदीच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांना परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांच्यासह मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत वालधूनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष नदीचा पाहणी दौरा (निरीक्षण) करण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून नदीच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेसाठी आवश्यक यंत्रणा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आली होती.
पाहणी दौऱ्याचे प्रमुख मार्गदर्शन शशिकांत दायमा, रेखा अत्तरदे, दिपाली आमडोस्कर व सुरेखा दिविलकर यांनी केले. तपासणी व निरीक्षण मोहिमेत वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील सिताराम उतेकर, तसेच भारती अय्यर, गणेश कांबळे, अनिल सरदार, सुरेश अहिरे व विशांत (बबली) कांबळे हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवला.
प्रदूषणमुक्त नदीसाठी शासन कटिबद्ध
पाहणी दौऱ्यानंतर वालधूनी नदीच्या पात्रात उतरून घटनास्थळांचे पंचनामे करण्यात आले असून संपूर्ण अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना व महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात येणार आहे. तसेच लवकरच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी संबंधितांना निमंत्रित केले जाईल. वालधूनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना दिली.
वालधूनीचे नाल्यात रूपांतर
उल्हास खोऱ्यातील मलंगगड पर्वत रांगेतील काकोळे गावातून उगम पावलेल्या वालधूनीची उपनदी आशेळे, माणेरे, वसार मार्गे कैलाशनगर, सह्याद्रीनगर, खडेगोळवली, अशोकनगर, शिवाजीनगर शहाड, घोलपनगर, योगीधाम, गौरीपाडा या मार्गाने कल्याणच्या खाडीला येऊन मिळते. या नदीच्या पात्रालगत नागरीकीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्याचबरोबर लघू आणि बड्या उद्योजकांकडून सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच नदीच्या पात्रात बिनदिक्कतपणे सोडले जाते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरीत लवाद आणि सर्वोच्च न्यायालयात दावे दाखल आहे. महाराष्ट्रातील ४२ प्रदूषित नद्यांपैकी वालधूनी ही सगळ्यात जास्त प्रदूषित नदी मानली जाते. या नदीचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. नदीचा नाला झाला आहे.
वालधूनी गेली चोरीला
नदी पात्राच्या दुतर्फा बेसुमार बेकायदा बांधकामे झाली आहेत. त्यामुळे नदीचे पात्र अरूंद होत गेले आहे. दर पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यावर नदी काठची लोकवस्ती पाण्याखाली जाते. नदी पात्राच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात पाणी घुसते. नदीची लो लाईन लक्षात न घेता बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. या सगळ्या विविध करणांमुळे ही नदी राहिलीच नसून नदी चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाढती अतिक्रमणे वालधूनीसाठी घातक
लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या उदासीनतेमुळे गेल्या काही वर्षात वालधूनी नदीला नाल्याचे स्वरूप आले आहे. नदी किनारी उभ्या राहिलेल्या रासायनिक कारखाने, कापड-जीन्सवर प्रक्रिया करणारे उद्योगांनी, काही इतर प्रकल्पांनी रासायनिक, मलयुक्त सांडपाणी या नदीत सोडल्यामुळे नदी पूर्णत: प्रदूषित झाली आहे. नदी पात्रात ठिकठिकाणी भूमाफियांकडून अतिक्रमणे झाली आहेत. त्यांना राजकारणी व सबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे पाठबळ लाभल्याने वालधूनी नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आजही अशी अतिक्रमणे सर्रास सुरूच आहेत.