Financial fraud : कल्याणमध्ये बनावट ई-मेल आयडीने बुडवला ९१.४३ कोटींचा जीएसटी

Financial fraud : कल्याणमध्ये बनावट ई-मेल आयडीने बुडवला ९१.४३ कोटींचा जीएसटी
Published on
Updated on

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : वस्तू व सेवा कर विभागाच्या पोर्टलवरील कल्याणमधील एका व्यावसायिकाच्या ई-मेल आयडीमध्ये अज्ञाताने परस्पर छेडछाड करून त्या व्यावसायिकाच्या नावाने तब्बल ५०० कोटींची आर्थिक उलाढाल केली. आणि त्या अज्ञाताने वस्तू व सेवा कर विभागाचा ९० कोटीचा जीएसटी बुडविल्याचा (Financial fraud) प्रकार उघडकीस आला आहे. हा बेनामी प्रकार निदर्शनास येताच व्यावसायिकाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण आता आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले असून यातील आरोपीच्या अटकेनंतर मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कल्याण पश्चिमेतील लाल चौकी भागात असलेल्या नीळकंठ धारा सोसायटीत राहणारे किशन चेतन पोपट (वय २३) हे व्यवसायिक आहेत. त्यांची श्री कृष्णा इन्व्हेस्टमेंट नावाने फर्म आहे. ते एंजल ब्रोकिंग या कंपनीची फ्रॅंचाईजी घेऊन डिमॅट खाते उघडण्याचा व्यवसाय करतात. किशन यांनी संगणक प्रणालीवर व्यवसायाकरिता जीएसटी क्रमांक 27EZ4PP1327Q1ZC काढला आहे. या क्रमांकाच्या जुळणीसाठी त्यांनी आपला मोबाईल क्रमांक जुळणीला जोडला आहे. कुणीतरी अनोळखी व्यावसायिकाने किशन पोपट यांच्या जीएसटी पोर्टलवरील संगणक प्रणालीमध्ये परस्पर फेरफार केले. त्याने किशन यांचे फर्म प्लास्टिक पिशवी खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याचे दाखविले. किशन यांच्या जीएसटी पोर्टलला सदर अज्ञात व्यावसायिकाने स्वतःचा फेरफार केलेला ई-मेल आयडी जोडला. त्यानंतर त्या अज्ञात व्यावसायिकाने किशन पोपट यांच्या फर्मच्या जीएसटी क्रमांकावरुन किशन यांना काहीही कळू न देता श्रीकृष्ण इन्व्हेस्टमेंट या नावे नोव्हेंबर २०२० पासून २५ जून २०२१ पर्यंत ५०२ कोटी ४२ लाख ७८ हजार ८५६ रूपयांचे आर्थिक व्यवहार केले.

या व्यवहारामध्ये अज्ञात व्यावसायिकाने ९० कोटी ४३ लाख ७० हजार १९४ रुपयांचा जीएसटी न भरता राज्य शासन व मूळ व्यवसायिक किशन पोपट यांची आर्थिक फसवणूक (Financial fraud)  केली . वस्तू व सेवा कर विभागाकडून किशन यांना जीएसटी रकमेबाबत विचारणा झाल्यानंतर फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला. बाजारपेठ पोलिसांनी अज्ञात व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा सखोल चौकशीकरिता ठाण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे पाठविण्यात आला असून पोलीस निरीक्षक चंद्रकांत काटकर याबाबत अधिक तपास करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : विधानसभा निवडणूक : भाजपाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव नेमका कशामुळे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news