

Kalyan Dombivli Dog Bite Cases
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम रूग्णालयात दाखल होणाऱ्या डॉग बाईटच्या रुग्णांच्या संख्येतून दिसून येत आहे.
गेल्या वर्षी २०२५ मध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका रूग्णालयांत २१ हजार १६५ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद झाली होती. तर यंदा २०२६ च्या केवळ पहिल्या सहा महिन्यांतच १८ हजार ४४७ जणांना कुत्र्यांचा चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ सहा महिन्यांतच जवळपास तेवढेच बळी गेले आहेत. आकडेवारी पाहता या वर्षाच्या अखेरपर्यंत हा आकडा ३५ हजारांहून अधिक जाण्याची शक्यता आहे. सकाळी शाळेत जाणाते विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसह सर्वसामान्यांना रस्त्यावरून जाताना भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांचा सामना करावा लागत आहे.
अनेक ठिकाणी कुत्रे एकत्र येऊन एकट्या दुकट्या पादचाऱ्यांवर हल्ला करत असल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. डोंबिवलीसह कल्याण पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण भागात हा त्रास सर्वाधिक आहे. रात्रीच्या वेळी आणि पहाटे तर रस्त्यावरून चालणेही मुश्किल झाले आहे. केडीएमसी प्रशासनाने वेळोवेळी निर्बीजीकरण आणि लसीकरण मोहिमा हाती घेतल्या असल्या तरी त्या अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येण्याऐवजी वाढत चालल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
डॉग बाईटनंतर रेबीजचा धोका लक्षात घेता रूग्णांना तातडीने लस घ्यावी लागते. त्यामुळे रूग्णालयांवरही प्रचंड ताण वाढला आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणेवर भार आणि दुसरीकडे नागरिकांच्या जीवाला धोका अशी दुहेरी समस्या निर्माण झाली आहे.
या संदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आम्ही गांभीर्याने घेतला आहे. निर्बीजीकरण आणि अँटी रेबीज लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबविली जाणार आहे. तसेच नागरिकांनी कचरा उघड्यावर न टाकता बंद डब्यात टाकावा जेणेकरून कुत्र्यांना अन्न मिळणार नाही. यासाठी केडीएमसीच्या आरोग्य विभागाला विशेष पथके गठीत करून गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या सहकार्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
केडीएमसी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेला गती द्यावी, सार्वजनिक ठिकाणी पिंजरे लावून कुत्र्यांना पकडावे आणि कल्याण-डोंबिवलीकरांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक नेमावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. अन्यथा या दहशतीमुळे मोठा अनर्थ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.