KDMC Election Results : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना-भाजपाचे वर्चस्व

शिवसेना 53, तर भाजपाचे 50 उमेदवार विजयी; महापौर पदासाठीच्या समीकरणाकडे लागले लक्ष
KDMC Election Results
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाpudhari photo
Published on
Updated on

डोंबिवली : बहुप्रतीक्षेत असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक पार पडून निकाल लागला आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाचे वर्चस्व राहिले असून शिसेनेचे 53 तर भाजपाचे 50 उमेदवार विजयी झाले आहेत. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11, मनसेचे 5, काँग्रेसचे 2 तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा 1 उमेदवार निवडून आला आहे. तर आता सत्तेच्या सारीपाटात महापौर पदासाठी शिवसेना/भाजपा महायुतीचा महापौर बसविणार की शिवसेना, भाजपा उबाठा, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत घेऊन अंबरनाथ प्रमाणे सत्ता स्थापन करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्ष आणि भाजप पाठोपाठ ससा-कासवाच्या खेळाप्रमाणे एकमेकांचा पाठलाग करत आहेत. पालिकेतील सत्तेच्या सारीपाटासाठी आता मोठा भाऊ कोण यासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्ष आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.

KDMC Election Results
BJP strong performance Thane : ठाणे जिल्ह्यात मोठा भाऊ भाजपच

युतीमधील या दोन्ही पक्षांमधील नेत्यांनी सामंंजस्याने घेतले तर महायुतीचा महापौर पालिकेत बसेल. अंबरनाथसारखा छुपा कित्ता राबवून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न भाजपाकडून झाला तर, मात्र नवीन राजकीय दंगा कल्याण-डोंबिवलीमध्ये सुरू होईल, अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

मागील काही महिन्यांपासून डोंबिवलीचे आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केडीएमसीवर भाजपचा महापौर बसेल यादृष्टीने कार्यकर्त्यांना कामाला लावले. पालिका निवडणुका जाहीर झाल्या. प्रचार सुरू झाला तरी भाजपाचा स्वबळाचा नारा सुरू होता. युतीची घोषणा शेवटपर्यंत करण्यात आली नाही. मुंबईत बसून गुपचूप शिवसेना 68, भाजपा 54 जागांचे वाटप करण्यात आले.

जागा वाटपानंतरही एकमेकांवर कुरघोड्या करत युतीचे नेते प्रचार करत होते. या सगळ्या प्रकाराने अस्वस्थ शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनी भाजपच्या स्वबळाच्या चाली विषयी दिल्लीतील नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली. मग कल्याण-डोंबिवलीत भाजप पदाधिकारी, नेते जुन्या वळणावर येऊन महायुतीचे नारे देऊ लागले.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकालानंतर शिवसेना शिंदे गट आणि त्या पाठोपाठ भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गट 53 पर्यंत, भाजप 50 पर्यंत मजल मारेल, असे प्राथमिक चित्र आहे. युतीच्या नेत्यांची मैदानी सभा गाजवून युतीचे पदाधिकारी, नेते आणि उमेदवारांनी हे यश संपादन केले आहे.

KDMC Election Results
Manakeshwar Temple : माणकेश्वरचं स्थापत्यवैभव

निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंंसेवकांनी सुप्तपणे महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे धोक्याच्या पातळीवर असलेले डोंबिवली पश्चिमेतील विष्णूनगरमधील प्रभागांचे भाजपाचे उमेदवार तरले. पूर्व भागातही भाजपा उमेदवार असलेल्या प्रभागात संघाने तीक्ष्ण दृष्टीने काम करून भाजपा युतीचे उमेदवार विजयी करण्यात हिरीरीने सहभाग घेतला.

डोंबिवली विधानसभा मतदार संघ हा भाजपाचा असला तरी आता भाजपा प्रदेशाध्यक्षांचे शहर आणि महापालिका म्हणून भाजपाने आपला प्रत्येक उमेदवार निवडून येईल, यासाठी विशेष काळजी घेतली. याच खेळीतून भाजपाने डोंबिवलीत आपले 14 उमेदवार बिनविरोध निवडून आणून आम्ही करून दाखविलेचा झेंडा फडकविला.

उमरावांना दणका...

वर्षानुवर्ष एकाच प्रभागात आपली वतनदारी कायम ठेवून नागरिकांच्या कामांपेक्षा प्रभागात बेकायदा इमारती, चाळी उभारण्यात पुढाकार घेणाऱ्या आणि नागरिकांना दुय्यम स्थान देऊन त्यांची नागरी समस्या, विकासाची कामे करण्यास नकार देणाऱ्या जुन्या जाणत्या स्वत:ला उमराव समजणाऱ्या माजी नगरसेवकांना मतदारांनी पराभवाचा दणका दिला. काही नगरसेवक नगरसेवक पद मिळाल्यापासून आपण नागरी विकासाची कामे करण्यासाठी निवडून आलो आहोत की आपले इमारतीचे बांधकाम आराखडे मंजूर करण्यासाठी आलो आहोत याचा विचार न करता दिवसभर पालिकेच्या नगररचना विभागात इमारत बांधकामे आराखडे मंजुरीसाठी, टीडीआर, एफएसआयच्या दलालीसाठी ठाण मांडून होते. त्यांनाही मतदारांनी घरचा रस्ता दाखविला आहे.

नवख्या चेहऱ्यांना संधी

मागील दहा वर्षापासून प्रभागात कधीतरी नगरसेवक होऊ या विचाराने सामाजिक काम करणाऱ्या डोंबिवलीतील प्रल्हाद म्हात्रे, संदेश पाटील, मधुर म्हात्रे यांच्यासारख्या तळमळीच्या कार्यकर्त्यांना मतदारांनी पक्षीय विचार न करता शहर सुधारणारा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. डॉक्टर, वकील उमेदवारांना मतदारांंनी पसंती देऊन निवडून आणले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news