

नीती मेहेंदळे
उस्मानाबाद म्हणजे आताचा धाराशीव जिल्हा अनेक सुंदर मंदिर स्थापत्यांनी संपन्न आहे. माणकेश्वर हे बार्शी गावाजवळ 17 किमीवर असलेले एक लहानसे गाव. विश्वरूपा नदीच्या किनारी माणकेश्वर गावाबाहेर असलेले शिव मंदिर हेमाडपंती मंदिरांच्या प्रकारातील असून स्थापत्य दृष्टिकोनातून ते महत्त्वाचे आहे. हे मंदिर ग्रेनाईटच्या काळ्या पाषाणापासून बनवलेले असून त्यावर सुंदर कलाकुसर केलेली आहे. स्थापत्यशास्त्रीय आणि मूर्तिकलेच्या वैशिष्ट्यांवर आधारित, संशोधकांच्या मते हे मंदिर इ.स.च्या बाराव्या शतकातील आहे आणि या मंदिरावर कल्याणीच्या चालुक्यांच्या शैलीचा प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो. पण, मंदिर यादव राजवटीत बांधले गेले आहे आणि त्याचा पुरावा म्हणून मंदिराच्या आवारात एक शिलालेख आहे, जो इ.स. 1223 सालचा आहे. यामध्ये यादव राजा सिंघण द्वितीय याने केलेल्या दानाची नोंद असावी असे दिसते.
माणकेश्वरचे शिवमंदिर पूर्वाभिमुख असून एका चारेक फूट उंच पीठावर बांधलेले आहे. त्या आधी उपपीठ असून पीठावर मंदिरात जायला उपपीठावरून पायऱ्या आहेत. पायऱ्यांवरही नक्षीकाम आढळते. पीठ आणि मंदिर यांत प्रदक्षिणा पथ आहे. मंदिराची रचना मुखमंडप, गुढमंडप, सभामंडप, अंतराळ, गाभारा अशी सर्वसाधारण आहे. गर्भगृहाची द्वारशाखा आणि सभामंडपातले कोरीव स्तंभ ही या मंदिराची दोन मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
मुखमंडप हा अर्धभिंतींनी वेढलेला असून त्याला आतल्या बाजूने भिंतींना लागून बसायला कक्षासने आहेत. या मंडपात दोन स्तंभ असून दोन बुटके म्हणजे वामन स्तंभ आहेत. ते कक्षासनावर आहेत. मुखमंडपाची अर्धभिंत कोरीव कामाने सजली आहे ज्यात गजथर आणि अश्वथर दिसतात. मंडप चौरसाकृती असून मधोमध रंगशिळा आहे. मंदिरात एकूण वीस स्तंभ आहेत. मंडपातल्या चार कोरीव स्तंभांवर छत पेलले आहे. स्तंभांवर शिव, कृष्ण, सुरसुंदऱ्या, इत्यादी मूर्ती आहेत. उत्तम कोरीव काम असलेले हे चौरस आकाराचे स्तंभ मंडपात मधोमध आहेत. त्यांचे तळखडे सुद्धा चौरसाकृती आहेत.
स्तंभांवर आडवे पट्ट असू त्यांच्या प्रत्येक बाजूला शिल्पे आहेत. स्तंभांच्या अष्टकोनी भागांवर कणी कुमुद हे भाग शेवटी अधिक चिन्हाचे हस्त आहेत. त्यांवर कीचक कोरले आहेत. मंदिरातले अर्धस्तंभ त्यामानाने साधे आहेत. अंतराळ हे दालन अतिशय लहान आहे आणि त्यात भिंतींवर दोन रिकामी देवकोष्ठे आहेत. हे मंदिर त्रिदल पद्धतीचे आहे. मंदिराच्या गूढमंडपात दोन बाजूंना एकेक गर्भगृहे आहेत. त्यांचे स्वतंत्र प्रक्षेपण बाहेरून दिसत नाही आणि ती मंदिराच्या सामान्य आराखड्यात सामावून घेतली आहेत. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे, त्याचा गर्भगृह आणि गूढमंडप दोन्ही खंडित तारकाकृती आराखड्यावर आधारित आहेत.
मंदिराचा गाभारा पूर्वाभिमुख असून 10 बाय 10 फूट असा चौरसाकृती आहे. तो अंतराळ आणि मंडप यांच्या पातळीपेक्षा 6 फूट खाली आहे. गाभाऱ्यात जाण्यास पायऱ्या आहेत. याप्रकारे शिवलिंगाच्या रचनेला पाताळलिंग असे म्हणतात. अंबरनाथचा गाभाराही या प्रकारात मोडतो. गाभाऱ्याबाहेरच्या बाजूस मकर प्रणाल आहे. मंदिर त्रिदल पद्धतीचे असून याशिवाय दोन अजून गाभारे मंदिराला आहेत. या दोन्ही गर्भगृहांमध्ये मूळ मूर्ती नाहीत. दक्षिणेकडील गर्भगृहाच्या द्वारशाखेवर द्वारपालांच्या रूपात भैरवाची शिल्पे आहेत, तर उत्तरेकडील गर्भगृहाच्या द्वारशाखेवर वैष्णव द्वारपाल आहेत. बाह्यभागात, शाक्त देवतांची शिल्पे आहेत आणि उत्तरेकडील जंघेवर वैष्णव देवतांची शिल्पे आहेत.
मंदिराची मुख्य गाभाऱ्याची द्वारशाखा सप्तशाखा प्रकारात मोडणारी असून तिला हस्तिनी असे संबोधले जाते. बाकी दोन्ही गाभाऱ्यांच्या द्वारशाखा मात्र इतक्या प्रभावी नाहीत. मंदिराचे मुख्य गर्भगृह शिवाला समर्पित असले तरी, त्यावर शाक्त पंथाचा प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो. अधिष्ठानाच्या कुंभपट्टीवर 64 देवींची शिल्पे कोरलेली आहेत. त्या मंदिराच्या खालच्या भागाभोवती एक पट्टा तयार करतात. यामध्ये भैरवी, गिरिजा पार्वती, सरस्वती, लक्ष्मी इत्यादी देवींचा समावेश आहे. जंघेवरही महालक्ष्मी, वारुणी, ऋद्धी, इंद्राणी, निऋती शक्ती, महिषासुरमर्दिनी यांसारख्या देवींची शिल्पे कोरलेली आहेत. अधिष्ठानाच्या कुंभपट्टीवर काही शिल्पट आहेत, जे शाक्त तांत्रिक विधींकडे निर्देश करताना दिसतात.
मंदिराचे बाह्यांग विलक्षण आकर्षक झाले आहे ते त्यावरच्या मूर्तिकलेमुळे. पीठावर साम्राज्याचा बल-निदर्शक गजथर आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस मूर्ती प्रामुख्याने जंघा, कुंभ आणि कक्षासन भागांवर कोरलेल्या आहेत. मंदिराच्या बाह्यभागावर विविध देव-देवतांच्या प्रतिमांचे चित्रण हे भारतीय मंदिर स्थापत्यकलेचे एक वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. मंदिराच्या आतील आणि बाहेरील दोन्ही बाजूंवर कोरलेल्या या प्रतिमा केवळ सजावटीच्या उद्देशापेक्षा बरेच काही साध्य करतात.
या प्रतिमा अनेकदा एखाद्या विशिष्ट मंदिराची तात्विक किंवा सांप्रदायिक संलग्नता दर्शवण्यासाठी निवडकपणे कोरलेल्या असतात. हरिहराची मूर्ती शैव-वैष्णव संप्रदायांचं ऐक्य दाखवायचं काम करते. मंदिराला अनेकदा विश्वाची प्रतिकृती मानले जाते म्हणूनच मंदिराच्या बाह्यभागावर केवळ विविध देव-देवतांच्याच नव्हे, तर दिक्पाल, ऋषी, गंधर्व, सुरसुंदरी, नर्तक, वादक, प्राणी आणि मानवांच्या प्रतिमा देखील कोरलेल्या असतात.
देवतांपैकी विष्णू, खटवांगधारी शिव, आवेशपूर्ण महिषासुरमर्दिनी, इंद्र, अग्नी, गणेश, यांशिवाय त्रिपुरांतक शिव, नरमुंडमाला परिधान केलेला उभा भैरव, आदी शिवाच्या अवतार मूर्ती दिसतात. सुरसुंदरी या शिल्प प्रकारातील अनेक मूर्ती इथे आढळतात. त्यांत पुत्रवल्लभा, विषकन्या, दर्पणा, आलसा, पत्रलेखिका, नुपूरपादिका, खंजरीवादिनी, शालभंजिका, इ. मूर्ती महत्वाच्या व बऱ्या स्थितीत आहेत. मुख्य मंदिरासमोर नंदीमंडप आहे. या नंदीमंडपाला चौरसाकृती पीठ असून पीठाच्या भिंतीवर प्रथम हंसथर व त्यावर गजथर आहे.
पीठावर नंदी आणि काही सुट्या मूर्ती आणून ठेवलेल्या दिसतात. मौखिक परंपरेनुसार, मुख्य मंदिराभोवती आणखी सात मंदिरे होती, परंतु ती आता सर्व अस्तित्वात नाहीत. दरवर्षी मराठी चैत्र महिन्यात येथे उत्सव साजरा केला जातो. ज्यात गावातील सर्व लोक प्राचीन परंपरा साजऱ्या करण्यासाठी मंदिरात येतात. सटवाई देवीचे मंदिर शिवमंदिराच्या शेजारीच आहे. सटवाई देवी ही भाग्याची देवता असून तिला सहाव्या दिवसाची देवी म्हणूनही ओळखले जाते. या गावातील रत्नपारखी हे ऐतिहासिकदृष्ट्या योद्धे होते. त्यांनी या समाजासाठी अनेक विकासकामे केली असा इतिहास आहे.