

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरांचे विद्रूपीकरण करणाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. केडीएमसीच्या सर्व प्रभागांत कारवाया करून केडीएमसीने दंडात्मक कारवाई व्यतिरिक्त त्यांनी ठिकठिकाणी लावलेले ८९० बॅनर्स, पोस्टर्ससह झेंड्यांची जप्तीनंतर विल्हेवाट लावून टाकली आहे. कारवाया करूनही कुणी अतिरेक करत असल्यास त्याला थेट पोलिस ठाण्याचा रस्ता दाखविण्यात येणार असल्याचा इशारा केडीएमसी प्रशासनाने दिला आहे.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी शहरांचे विद्रूपीकरण करणारे कुणीही असोत, त्यांची गय करायची नाही, असे सक्त निर्देश दिले आहेत. बॉसने दिलेल्या आदेशांना प्रमाण मानून प्रभाग क्षेत्रातील सहाय्यक आयुक्तांनी केडीएमसीच्या मालमत्ता विभागाची परवानगी न घेता शिवाय त्यासाठी लागणारा कर न भरता फुकटबूंनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रस्ते आणि चौकांत बॅनर्स, झेंडे, पोस्टर्स, होर्डिंग्ज लावून शहरांचे विद्रूपीकरण केल्याच्या तक्रारी कल्याण डोंबिवलीतील जागरूक रहिवाशांकडून सातत्याने महापालिकेकडे जात असतात. अशा तक्रारी येणार नाही याची प्रत्येक प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याने दक्षता घेण्याचे आयुक्त अभिनव गोयल यांनी आदेश दिले आहेत. ही कारवाई यापुढेही नियमित स्वरूपात सुरू राहणार असून अनधिकृतरित्या लावण्यात आलेले सर्व पोस्टर्स, होर्डिंग्ज, बॅनर्स संबंधितांनी स्वतःहून काढून घ्यावेत आणि आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि विद्रुपतेच्या विळख्याबाहेर ठेवण्यासाठी महापालिकेत सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते/चौकांत कोणत्याही प्रकारच्या परवानग्या न घेता बॅनर्स, होर्डिंग्ज, पोस्टर्स चिटकवून शहरांचे विद्रुपीकरण करणाऱ्या फुकटचंबूंना यापुढे चाप लावला जाणार आहे. अशा महाभागांकडून दंड वसूल करून त्यांना आर्थिक दणका देखिल दिला जाणार आहे. अशा जाहिरातदारांच्या विरोधात महाराष्ट्र मालमत्ता विरुपण प्रतिबंधक अधिनियम १९९५ च्या कलम ३ नुसार पोलिस ठाण्यात कायदेशीर फिर्यादी दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा केडीएमसी प्रशासनाने दिला आहे.
कल्याण-डोंबिवलीला विद्रूपीकरणातून करण्यासाठी केडीएमसीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणत्याही प्रकारचे शुल्क न भरता शहराच्या रस्ते, नाक्यांवर पोस्टर, बॅनर्स, होर्डिंग्ज आणि कमानी उभारणाऱ्या फुकट्या चमकेशांचा बुरखा प्रशासनाने फाडून टाकला आहे. वेगवेगळ्या प्रकारे जाहिरातबाजी करणाऱ्या आणि शहराच्या विद्रुपीकरणात भर घालणाऱ्या विविध प्रभागांतील होर्डिंग्ज, बॅनर्स, शेड्स, तसेच पदपथांवरील अतिक्रमणांवर निष्कासनाची झोड घेण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली नगरी अधिकाधिक चांगली, सुंदर दिसावी, तसेच कल्याण-डोंबिवलीकरांना पदपथावरुन चालताना मोकळा श्वास घेता यावा, या दृष्टीकोनातून आयुक्त अभिनव गोयल आक्रमक भूमिका घेतली आहे.
१/अ प्रभागामध्ये ३८ बॅनर्स, ८ पोस्टर्स व १० झेंडे काढण्यात आले.
२/ब प्रभागामध्ये १२० बॅनर्स व पोस्टर्स काढण्यात आले.
३/क प्रभागामध्ये ५२ बॅनर्स व पोस्टर्स काढण्यात आले.
४/जे प्रभागामध्ये १५ बॅनर्स, १४ पोस्टर्स व २० झेंडे काढण्यात आले.
५/ड प्रभागामध्ये ८२ बॅनर्स व ३ झेंडे काढण्यात आले.
६/फ प्रभागामध्ये ३० बॅनर्स, ३३ पोस्टर्स व ३० झेंडे काढण्यात आले.
७/ह प्रभागामध्ये १०५ बॅनर्स काढण्यात आले.
८/ग प्रभागामध्ये ५० बॅनर्स, २० पोस्टर्स व ४९ झेंडे काढण्यात आले.
९/आय प्रभागामध्ये ८९ बॅनर्स व पोस्टर्स काढण्यात आले.
१०/ई प्रभागामध्ये १४० बॅनर्स काढण्यात आले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कर देयके मालमत्ताधारकांना वितरीत केली आहेत. अनेकांनी अद्यापही कराचा भरणा केलेला दिसून येत नाही. अशा मालमत्ताधारकांच्या मिळकतींना जप्ती वॉरंट पूर्व सूचना बजावण्यात येत आहेत. तरीदेखिल विहित मुदतीत कराचा भरणा न केल्यास संबंधितांच्या मालमत्तांवर जप्ती/अटकावणीची कारवाई होणार आहे. त्याचबरोबर अशा मालमत्तांची नळ जोडण्या खंडीत केल्या जाणार आहेत.
मालमत्ता कराचा भरणा तातडीने विहित मुदतीत करुन महापालिकेस सहकार्य करावे. थकीत मालमत्ता कराच्या रक्कमेवर दर महिना २ टक्के दंडात्मक कारवाई, जप्ती/अटकावणी, नळ जोडणी खंडीत करणे अशी अप्रिय कटू कारवाई टाळावी, असे मालमत्ता कर विभागामार्फत करदात्यांना आवाहन करण्यात आले आहे.