

डोंबिवली : तू मला आवडतेस... माझ्या सोबत येतेस का...असे बोलून एका उत्तरभारतीय तर्राट दारूड्याने फुले आणि गजरे विकणाऱ्या मराठी महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तथापी प्रसंगावधान राखून या महिलेने विजेच्या चपळाईने दोन हात करून दारूड्याच्या तावडीतून सुटका करवून घेतली. या दारूड्याला संतप्त जमावाने मारून पोलिसांच्या स्वाधीन केले. हा सारा प्रकार डोंबिवली पूर्वेकडील नेहरू रोडला असलेल्या भाजी मार्केटमध्ये घडला. हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेल्यानंतर रणरागिणीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून या दारूड्याची पोलिसांनी झिंग उतरवून टाकली.
श्रीकेश शिवयश चौबे (४६, रा. सिध्दार्थनगर झोपडपट्टी, कोपर रोड, डोंबिवली - पश्चिम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या संदर्भात पश्चिम डोंबिवलीत राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम ७४, ७५, ११५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला पश्चिम डोंबिवलीत राहत असून स्वतःचा चरितार्थ आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत स्टेशन परिसरात फुले आणि गजरे विक्री करते.
या कामात तिला दोन्ही मुले देखील हातभार लावतात. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास या महिलेवर भयंकर प्रसंग गुदरला. घरी जाण्यापूर्वी पूर्वेकडे आईस्क्रीम खरेदी करून नेहरू रोडला असलेल्या भाजी मार्केटमधून पायी जात असताना पाठीमागून एक अनोळखी इसम आला. या महिलेशी लगट करून मला तू आवडतेस, असे बोलून त्याने अश्लील चाळे केले. या प्रकाराने महिला भयभीत झाली. त्याच्या तोंडातून दारूचा वास येत होता.
तू कोण आहे रे ? असे विचारून महिलेने दारूड्याला झटकारले असता त्याने हात पकडून तू माझ्यासोबत येते का ? असे विचारले असता या महिलेने त्याच्या कानाखाली मारण्यासाठी हात उचलला असता त्याने हात अडवला व तो त्याचा नाकावर लागला. महिलेने आरडाओरडा केल्याने तेथे थांबलेल्या लोकांनी त्या दारूड्याला मारुन पोलिस ठाण्यात नेले. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक ईश्वर कोकरे अधिक तपास करत आहेत.