Kalyan Encroachment Action: वालधुनीतील बुद्धभूमी कारवाईवरून वाद चिघळला; केडीएमसीच्या खुलाशाला फाऊंडेशनचा विरोध कायम

धार्मिक स्थळांची तोडफोड केल्याचा आरोप
Kalyan Encroachment Action
Kalyan Encroachment ActionPudhari
Published on
Updated on

डोंबिवली: कल्याण पश्चिमेतील वालधुनी परिसरातील बौद्ध समाजाचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या बुद्धभूमी फाऊंडेशन परिसरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने केलेल्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या या कारवाईविरोधात बौद्ध समाजातील विविध संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून समाज माध्यमांवरही या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे.

Kalyan Encroachment Action
Khodala Stray Cattle Menace: खोडाळा येथील बाजारपेठेत मोकाट जनावरांचा उच्छाद; फळं-भाजी आणि खाऊ विक्रेते त्रस्त

प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडी या दरम्यान प्रस्तावित चार पदरी उड्डाणपूल प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेने अडथळे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत वालधुनी येथील बुद्धभूमी फाऊंडेशन परिसरात करण्यात आलेल्या कारवाईमुळे प्रशासन आणि फाऊंडेशन यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून परिसरात आंदोलन, निदर्शने आणि घोषणाबाजी सुरू आहे. अनेक सामाजिक व बौद्ध संघटनांनी या कारवाईचा निषेध नोंदवला आहे. भन्ते गौतम रत्न यांनीही प्रशासनावर गंभीर आरोप करत धार्मिक स्थळावर अन्याय झाल्याचा दावा केला आहे.

आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ज्या जागेवर कारवाई करण्यात आली ती जमीन महापालिकेच्या मालकीची आहे. त्याची स्पष्ट नोंद सात/बारा उताऱ्यावर आहे. प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पासाठी ही जागा अत्यावश्यक असल्याने संबंधितांना नियमानुसार नोटिसा देण्यात आल्या होत्या.

तसेच अनेक वेळा चर्चा आणि समन्वय बैठका घेऊन तोडगा काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. कारवाईदरम्यान परिसरातील गौतम बुद्धांच्या चार मूर्ती आणि अन्य धार्मिक साहित्य अत्यंत काळजीपूर्वक सुरक्षित ठेवून बुद्धभूमी फाऊंडेशनच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आले. कोणत्याही धार्मिक भावनांना धक्का पोहोचू नये यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतल्याचा दावा आयुक्तांनी केला.

Kalyan Encroachment Action
Thane Municipal Promotion: हक्काच्या पदोन्नतीसाठी कर्मचाऱ्यांना महापालिकेचे उंबरे झिजवण्याची वेळ

फौजदारी कारवाईची मागणी

या घटनेमुळे बौद्ध समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा करत संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी फाऊंडेशनने केली आहे. तसेच महापालिका आयुक्त, संबंधित प्रशासकीय अधिकारी, पोलिस यंत्रणा आणि उड्डाणपुलाचे काम करणारी टीएनटी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

फाऊंडेशनचे गंभीर आरोप

दुसरीकडे बुद्धभूमी फाऊंडेशनने महापालिकेचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. फाऊंडेशनशी संबंधित पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही योग्य पूर्वसूचना न देता आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता अचानक कारवाई करण्यात आली. या कारवाईत तीन बुद्धमूर्ती, तीन बौद्ध स्तूप, भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती, भिक्खू निवास, धर्मशाळा तसेच विहाराची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप फाऊंडेशनने केला आहे.

समन्वयाच्या मार्गातून वादाचे भवितव्य

विकासकामांसाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देण्याची प्रशासनाची भूमिका आणि धार्मिक सामाजिक वारशाचे संरक्षण करण्याची मागणी करणाऱ्या बौद्ध समाजाची भूमिका यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. दोन्ही बाजू आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकीकडे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा उड्डाणपूल प्रकल्प आणि दुसरीकडे धार्मिक श्रद्धास्थानाचा प्रश्न यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण कल्याण-डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे. प्रशासन, बुद्धभूमी फाऊंडेशन आणि समाजातील प्रतिनिधी यांच्यात पुढील काळात कोणता समन्वयाचा मार्ग निघतो, यावर या वादाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news