

दीपक गायकवाड
खोडाळा: मोखाडा तालुक्यातील खोडाळा सारख्या महत्वपूर्ण बाजारपेठेत मोकाट जनावरांनी अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे.या मोकाट जनावरांमूळे भाजीपाला फळं आणि खाऊ विक्रेते अक्षरशः हैराण झालेले असून त्यांना रोजच मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत आहे.याबाबत स्थानिक व्यापारी आणि बाजारकरु यांचेकडून सातत्याने ओरड होत असते.
तथापी खोडाळा ग्रामपंचायत प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई झालेली नाही.त्यामूळे स्थानिक व्यापारी वर्गातून एकूणच ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली जात आहे.
मोकाट जनावरांच्या (उदा. गायी, बैल, म्हशी, डुकरे) समस्येवर नियंत्रण ठेवणे आणि रस्ते व सार्वजनिक जागा सुरक्षित ठेवणे ही ग्रामपंचायतीची कायदेशीर जबाबदारी आहे.घटनेच्या ११ व्या अनुसूचीनुसार, ग्रामपंचायतींना जनावरांच्या कोंडवाड्यांची ( कांजी हाऊस ) व्यवस्था करण्याचे अधिकार व कर्तव्य दिले आहे.
तथापी खोडाळा येथे अनेक वर्षे अस्तित्वात आणि कारवाईत वापरात असलेला कोंडवाडा अचानक अदृष्य झाला आहे.त्यामूळे मोकाट जनावरे कोंडवाड्यात कोंडवण्यास पर्यायच राहिलेला नसल्याने जनावरांचा दिवसेंदिवस मुक्त संचार वाढलेला असून पर्यायाने उपद्रव मुल्य वाढलेले आहे.
ग्रामपंचायतीची कर्तव्ये
१) कोंडवाडा ( कांजी हाऊस ) निर्माण करणे:
गावात मोकाट जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने कोंडवाड्याची निर्मिती करणे बंधनकारक असते.
२) जनावरे पकडणे
रस्त्यावर, चौकात किं वा बाजारपेठेत मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात डांबणे.
३)जनावरांचा लिलाव किंवा दंड
कोंडवाड्यात पकडलेल्या जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करणे. जर मालक वेळेत दंड भरून जनावरे सोडवून घेऊन गेला नाही, तर नियमानुसार जनावरांचा लिलाव करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला असतात.
४)अपघात टाळणे
मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलणे क्रमप्राप्त आहे.मात्र ग्रामपंचायत प्रशासनाला त्याचा सोयीस्कर विसर पडलेला आहे.त्याचाच परिपाक म्हणून अनेक ज्येष्ठ नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे.
पशू पालकांची जबाबदारी
पाळीव जनावरांना रस्त्यावर मोकाट सोडणे कायद्यानुसार गुन्हा आहे.जनावरांच्या निष्काळजीपणामुळे किंवा मोकाट सोडल्यामुळे जर एखाद्या नागरिकाला दुखापत झाली, किंवा रस्ता अपघातात प्राणहानी झाली, तर त्या जनावराच्या मालकावर फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात.
या बाबत ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधला असता, कोंडवाडा निर्मिती बाबत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांशी चर्चा करुन योग्य धोरण ठरवले जाईल तुर्तास मोकाट जनावरांचा बंदोबस्त ठेवण्यासाठी गावात ध्वनीक्षेपकावरून दवंडी देण्याची तजवीज केली जाईल.
देवीदास दोंदे ग्रामपंचायत अधिकारी,खोडाळा