

ठाणे :संपूर्ण कळवा प्रभाग समिती क्षेत्रातील तब्बल 52 अनधिकृत इमारतींमधील नागरिकांना इमारती खाली करण्याच्या नोटिसा ठाणे महापालिकेच्या वतीने पाठवण्यात आल्या आहेत. तत्कालीन सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी 2021 साली कळवा प्रभाग समितीमध्ये 52 इमारती अनधिकृत असल्याचा महत्वपूर्ण अहवाल परिमंडळ उपायुक्तांना दिला होता. मात्र या इमारतींवर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये तत्कालीन सहाय्यक आयुक्त घोंगे यांच्या अहवालावरून पालिका लेखी विचारणा केल्यानंतर आता पालिकेने नोटीस देण्याची कारवाई केली आहे.
मुंब्रा दिवा आणि शीळ भागातील अनधिकृत बांधकामाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने ठाण्याचे मुख्य न्यायमूर्ती यांना चौकशी करण्यासाठी जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जी. भन्साली यांची चौकशी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती. न्यायमूर्ती भन्साली यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि समाजसेवक यांची साक्ष घेतली होती.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी साक्ष दिली दिली होती. न्यायमूर्ती भन्साली यांनी महापालिका आयुक्त राव यांना 19 लेखी स्वरूपात प्रश्न विचारले होते. न्यायमूर्ती भन्साली यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये तत्कालीन सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी 24 ऑगस्ट 2021 साली कळव्यातील 52 अनधिकृत इमारतींचा अहवाल सादर केला होता. मात्र त्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नव्हती. तर प्रणाली घोंगे यांची तातडीने वृक्षप्राधिकरण विभागात बदली करण्यात आली होती.
आता न्यायालयानेच पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढल्यानंतर दिवाळीपूर्वीच 52 अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घरे खाली करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. यामध्ये काही बैठ्या घरांचा देखील समावेश आहे. 2017 काळातील ही सर्व बांधकामे असून काही कुटुंबीयांनी या नोटिसा घेतलेल्या नाहीत. बेघर होऊन आम्ही जाणार कुठे असा प्रश्न या रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
प्रणाली घोंगे यांच्या अहवालाबाबत न्यायालयाचे प्रश्न...
1. 24 ऑगस्ट 2021 रोजी तत्कालीन सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी उपायुक्त अतिक्रमण यांना कळवा प्रभाग समिती क्षेत्रात 52 इमारती अनधिकृत असल्याच्या अहवाल सादर केला होता. त्यावेळी उपायुक्त अतिक्रमण या पदावर कोण अधिकारी होते?
2. या इमारतींची सद्धस्थिती काय आहे?
3. या इमारतींचे निष्कासन झाले नसल्यास त्याची जबाबदारी कोणाची ?
4. 16 सप्टेंबर 2021 रोजीचे उपायुक्त परिमंडळ मनीष जोशी यांच्या सहीने कळवा प्रभाग समितीला पत्र पाठवण्यात आहे, त्यासोबत कळवा प्रभाग समितीचे कर निरीक्षक सोपान भाईक 14 जून 2021 रोजी 23 इमारती अनधिकृत असल्याची माहिती सादर केली. या इमारतींची सद्यस्थिती काय आहे.