

मुंबई : दिवाळीत मुंबईत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाल्याने मुंबईची हवा खराब झाली तसेच कचऱ्यामुळे मुंबई अस्वच्छही झाली होती. या काळात अतिरिक्त तीन हजार मेट्रीक टन इतका कचरा झाला होता. तो महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र एक करीत संकलीत केला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन नियमितपणे कार्यवाही केली जाते. यासह वेळोवेळी विशेष स्वच्छता मोहिमांचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे निर्मूलन तसेच दिवाळी काळात मुंबई अधिक स्वच्छ राखण्याचे निर्देश प्रशासनाकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. त्यानुसार नियमित स्वरूपातील स्वच्छता प्रक्रिया अंतर्गत सप्टेंबर 2025 पर्यंतच्या कालावधीत दररोज सरासरी 6 हजार 900 मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
तथापि, दिवाळी दरम्यान म्हणजेच 18 ते 21 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 3 हजार 75 मेट्रिक टन अतिरिक्त कचऱ्याचे प्रभावीपणे निर्मूलन केले. सुमारे 1 हजार मेट्रिक टन कचरा वाहतूक केंद्रांवरून उचलण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. या संपूर्ण कार्यवाहीत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी 3 हजार मेट्रिक टनांहून अधिक कचऱ्याचे व्यवस्थापन केले.
अशी लावली विल्हेवाट
या कालावधीत प्रतिदिन 7,300 मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. ही वाढ प्रतिदिन सरासरी सुमारे 600 ते 700 मेट्रिक टन इतकी आहे. अतिरिक्त निर्माण झालेल्या 3 हजार 75 मेट्रिक टन कचऱ्यापैकी 2 हजार 75 मेट्रिक टन कचऱ्याची कांजूर व देवनार क्षेपणभूमी येथे विल्हेवाट लावण्यात आली आहे.