Hospital renovation scam : कळवा रुग्णालयातील अधिष्ठात्यांची उचलबांगडी
ठाणे : वादग्रस्त कारभारामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या कळवा रुग्णालयातील आणखी एक गलथान कारभार समोर आला आहे. कळवा रुनाल्यातील नूतनीकरणाच्या कामात हलगर्जीपणा केल्याने रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता डॉ.स्वप्नाली कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कळवा रुग्णालयाचे नूतनीकरण करताना ऑक्सिजन वाहिनी बसवण्याची निविदाच काढण्यात आली नसल्याचा प्रकार उघड झाला होता. यावरून कळवा रुग्णालयाच्या या गलथान कारभाराच्या विरोधात मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी देखील कळवा रुग्णालयातील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली होती.
ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रातून रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून देखील रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असल्याने या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
या रुग्णालयाचे नूतनीकरणाचे काम काढण्यात आले होते. मात्र हे नूतनीकरण होत असताना ऑक्सिजन वाहिनी टाकण्यासाठी निविदाच काढण्यात आली नसल्याची बाब उघड झाली होती. यावरून अधिष्ठाता डॉ राकेश बारोट यांना ही चूक भोवली असून अखेर प्रशासनाने त्यांची बदली करून त्या ठिकाणी डॉ स्वप्नाली कदम यांची नियुक्ती केली आहे.
माळगावकर यांच्या बदलीचेही संकेत
या संपूर्ण प्रकरणात अधिष्ठाता यांच्यावर कारवाई करण्यात आली असली तरी वैद्यकीय अधीक्षक डॉ अनिरुद्ध माळगावकर यांच्या बदलीचे संकेत देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई होणार का नाही याबाबत उलट सुलट चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहेत.

