

पाली ः शरद निकुंभ
नोव्हेंबर मास उजाडला तरी पाऊस बरसण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने त्याचा मानवासह पशु,पक्ष्यांच्या जीवनमानावर विपरित परिणाण झाल्याचे जाणवू लागले आहे.दरवर्षी ऑक्टोबरपासूनच विदेशी पक्षी भारतात विशेष करुन रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी थव्याने येतअसतात.त्यांचे ते आकाशात विहारणे मन प्रसन्न करणारे असते.पण यावेळी पावसाचा मुक्काम वाढल्याने विदेशातून येणाऱ्या पक्ष्यांचे प्रमाणही घटले आहे.जे आलेत ते सुद्धा भूर्र करुन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होताना दिसत आहेत.एकूणच पावसाने साऱ्यांचे जीवनमानच बदलू टाकलेले आहे.
परतीच्या पावसाचा फटका येथील पक्ष्यांसह प्रामुख्याने स्थलांतरित पक्ष्यांना बसला आहे. पक्षी अभ्यासक व निरीक्षकांनी याबाबत नोंदी घेतल्या आहेत. लांबलेला पाऊस व बदललेत्या ऋतुमानाचा अनेक पक्ष्यांच्या जीवनचक्रावर परिणाम झाला आहे. तर घरटे बांधण्यास बाधा आली आहे. त्यानुसार पावसामुळे पक्ष्यांचे अन्नाचे स्रोत कमी झाले असल्याने त्यांना अन्नासाठी दाही दिशा फिरावे लागत आहे. हिवाळ्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात रोडावली आहे.
रायगड जिल्ह्यात मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला तो नोव्हेंबर महिना उजाडला तरी अजून सुरूच आहे. शिवाय हवामानात प्रचंड दमटपणा, ओलावा आहे. या प्रतिकूल वातावरणाचा परिणाम पक्ष्यांच्या एकूणच आरोग्यावर पडताना दिसत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरुवात होते. किंवा थंडीसाठी पोषक वातावरण बनते. परिणामी उत्तरेकडील बर्फाळ प्रदेशातील स्थानिक पक्षी उदरनिर्वाह करिता स्थलांतरित करायला सुरुवात करतात.
परतीच्या वादळी पावसामुळे स्थलांतरित पक्ष्यांची व येथील स्थानिक पक्ष्यांची देखील मोठी वाहतात झाली आहे. त्यांच्या स्थलांतराच्या चक्रावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच पाऊस लांबल्याने पक्ष्यांच्या आरोग्यावर हवामानाच्या बदलांचा प्रतिकूल परिणाम होतो. सततच्या पावसामुळे निवारा शोधणे कठीण जाते. पावसात भिजल्याने अनेक पक्षी आजारी किंवा मरण पावतात समुद्रकिनाऱ्यानहून अनेक आजारी पक्षी तसेच काही पक्षी नरमलेल्या अवस्थेत आढळून येत आहेत त्यात सीगल्स, टर्न, सॅन्डपायपर, प्लोव्हर, समुद्री कावळे यांसारख्या पक्ष्यांना फटका बसला आहे.
शंतनू कुवेसकर, पक्षीतज्ज्ञ,निसर्गप्रेमी
हिरव्यागार गवतावरील कीटक
पाऊस संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून वाढलेलं गवत आणि या गवतावरील कीटक म्हणजे या पक्ष्यांसाठी खाद्याचे भांडार असते. हिवाळ्याच्या दिवसात कीटकवर्गीय जीवांना मुबलक प्रमाणात खाण्यासाठी गवत असल्या कारणाने अनेक कीटक, फुलपाखरे, सरपटणारे जीव गवताच्या आणि झाडांच्या पानांच्या सानिध्यात आपली अंडी देतात. अगदी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला या कीटकांची ,फुलपाखरांची आणि सरपटणाऱ्या विविध जीवांची पिल्ले वाढलेल्या गवतावर आणि गवताच्या सानिध्यात दिसून येतात, हा कालावधी व वातावरण त्यांच्या वाढीसाठी पोषक असतो.
घरट्यांना आली बाधा
नोव्हेंबर मध्ये काही पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू आहे. मात्र परतीच्या वादळी पावसामुळे या घरट्यांना बाधा पोहोचली आहे. विशेषतः घरटी बांधणाऱ्या पक्ष्यांची घरटी वादळी पावसामुळे खाली कोसळली तर काही घरटी अपूर्ण राहिली आहेत. यामध्ये दयाळ, क्षमा, तुरेवाली पाकोळी, मैना, तांबट, बुलबुल, ब्राह्मनी व साधी घार आदी पक्षांच्या घरट्यांचा समावेश आहे. पाकोळी पक्ष्याची अंडी हलकी असतात वाऱ्यामुळे या पाकोळी अंडी देखील उडून गेली आहे.