

मुरबाड : जुन महीन्यात सुरु होणारा पावसाळा यावर्षी मे महिन्यापासून सुरु झालेला आहे. चार महीन्यांचा पावसाळा सहा महिन्याहून अधिक काळ उलटून देखील आजही कायम असल्याने उन्हाळ्याच्या अंतिम काळात सुरु होणारी, वाड्या पाड्यावरील पाणी टंचाई यावर्षी दूर होणार आहे. परंतू या पावसाने खरीप हंगामातील पिके पुर्णतः उध्वस्त केल्याने तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा नाही तर अन्न टंचाईचा सामना करावा लागणार आहे. या परिस्थितीमुळे भुकबळीं देखील जाण्याची शक्यता आहे.
ठाणे जिल्ह्यात मौसमी पावसाने परीसीमा गाठल्याने संपूर्ण ऋतूचक्र बिघडवून टाकले आहे. चार महिन्याचा पावसाळा सहा महिन्याचा काळ उलटून गेला तरी सुरुचं असल्याने हिवाळा आणि उन्हाळ्याचा ताळमेळ पुरता बिघडून गेला आहे. तालुक्यात ठराविक गावात रब्बी पिकं घेतली जातात, मात्र खरीप हंगामातील भात पिकांची काढणी अवकाळीने हुकवल्याने कापणीची वेळ कधीचीच निघून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरात काही पडणार नसल्याने या वर्षात तालुक्यात पाणी टंचाई जाणवणार नसली तरी अन्न टंचाई मात्र भेडसावणार आहे.
या अवकाळी पावसाने शेतीत पाण्याचे पाट वाहत असल्याने, जमीन कोरडी होण्यास जानेवारी फेब्रुवारी उजाडला असल्याने रब्बी हंगामात होणारी वाल, हरभरा, काकडी, भेंडीची लागवड देखील हुकणार आहे. त्यामुळे खरीप पिक कुजली आणि रब्बी लागवड हुकली जाणार असल्याने तालुक्यावर दुष्काळाचे शंभर टक्के सावट आलेले आहे.