

ठाणे : ठाण्यातील भटके श्वान पकडून या श्वानांचे बेकायदेशीरपणे प्रत्यारोपण करणारी टोळी सक्रिय असल्याची गंभीर बाब खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणली आहे. या कामासाठी उत्तर प्रदेश किंवा बिहारच्या काही मुलींची टोळी सक्रिय असून यामध्ये स्थानिक पेट सेंटर आणि डॉक्टरांचा देखील सहभाग असल्याचा संशय म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तत्काळ तपास करण्याचे आदेशही त्यांनी पालिका प्रशासनाला केले आहे.
ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते शुक्रवारी विविध आरोग्य सेवांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या कारभारावर समाधान व्यक्त करत असताना आरोग्य विभागाच्या तसेच संबंधित पशु वैद्यकीय विभागाच्या निदर्शनास ही गंभीर बाब समोर आणली. महानगरपालिका म्हणून काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो असे सांगत खा. म्हस्के यांनी काही खासगी हॉस्पिटल असतील त्यांच्या माध्यमातून काही लोक ठाण्यात येऊन भटके श्वान घेऊन जातात.
देवनार या ठिकाणी पाच पाच दहा दिवस त्यांना ठेवले जाते आणि त्यानंतर त्यांचे बेकायदेशीर अवयव प्रत्यारोपण केले जाते, अशी गंभीर माहिती त्यांनी यावेळी पालिका प्रशासनाला दिली. या कामासाठी उत्तर भारतीय टोळी सक्रिय असून त्यांना स्थानिक पेट सेंटर आणि डॉक्टरांची साथ असून हे एकप्रकारे रॅकेट असल्याचे म्हस्के यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
प्रशासनाला कानपिचक्या
ठाणे महापालिकेने याकडे गांभीर्याने बघायला हवे. मात्र या गंभीर बाबीकडे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत करत आहे की काय, अशा कानपिचक्या देखील म्हस्के यांनी प्रशासनाला यावेळी दिल्या. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या कामगिरीवर देखील समाधान व्यक्त केले. ज्याच्यावर सर्वात जास्त टीका होते, असा हा आरोग्य विभाग परंतु टीका होत असेल तरी खचून न जाता काम करणारा हा आरोग्य विभाग असल्याचे त्यांनी सांगितले.
कंत्राटावर माणसे घ्यावी लागतील
आपल्याला आरोग्य विभागात थोडसं चांगल्या पद्धतीने करावा लागेल. आपण जेव्हा सर्जिक इतर डिपार्टमेंट मध्ये कंत्राटी पद्धतीवर जशी माणसे घेतो तसे त्या डिपार्टमेंटमध्ये कंत्राटावर माणसे घ्यावी लागतील, अशा सूचना देखील म्हस्के यांनी यावेळी केल्या.