Thane Politics : ठाकरेंच्या सेनेला धक्का देत सुभाष भोईर भाजपच्या वाटेवर?
नेवाळी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बदलापुर येथे प्रचार सभेसाठी दाखल होणार होते. त्याआधी त्यांनी भाजप अंबरनाथ तालुका अध्यक्ष राजेश पाटील यांच्या घरी स्नेहभोजनाला हजेरी लावली. मात्र या भेटीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या उपस्थितीने. गेल्या काही दिवसांपासून भोईर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. फडणवीसांसोबत त्यांची झालेली भेट या चर्चांना आता जोरदार उधाण आले आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार असलेले सुभाष भोईर हे आगरी समाजात ठाणे रायगड परिसरात मजबूत पकड असलेले नेते मानले जातात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे यांनी केला होता. मात्र तरीही आगरी समाजातील त्यांचा प्रभाव अजूनही तगडा असल्याचे स्थानिक राजकीय मंडळींचे मत आहे.
येत्या केडीएमसी आणि ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आपली ताकद वाढविण्यासाठी महत्त्वाच्या नेत्यांना जोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये सुभाष भोईर यांची एंट्री झाली तर आगरी मतदारसंघातील समीकरणे बदलू शकतात.
भाजपला या परिसरात मोठा राजकीय फायदा मिळू शकतो. फडणवीसांच्या भेटीत राजकीय चर्चा झाली का याबाबत अधिकृत प्रतिक्रिया कुणी देत नसले तरी भाजपमध्ये भोईर यांच्या प्रवेशाची चर्चा शिगेला पोहोचली आहे. स्नेहभोजनाचा हा कार्यक्रम भाजपच्या ‘मोठ्या रणनीती’चा भाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असल्याचे दिसते.
भोईर भाजपवासी होणार का ?
भाजपा तालुका अध्यक्ष राजेश पाटील यांच्या घरी स्नेह भोजनाला फडणवीस आले असताना त्यांच्यासोबत वन मंत्री गणेश नाईक, मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांसह दिग्गज नेते उपस्थित होते. दरम्यान भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुभाष भोईर यांची एंट्री पक्षांतराच्या बाजूनेच झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान यावर भोईर यांच्याकडून कोणतंही स्पष्टीकरण आलं नसलं तरी भोईर हे भाजपवासी होणार असल्याचं ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

