

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील गोवेली येथे महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपविभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेला मध्यरात्री भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. आगीचा भडका इतका प्रचंड होता की त्याचे लोण शेजारील आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत पसरले. या आगीत पाणी तपासणी प्रयोगश-ळेचे सुमारे ३० ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून आरोग्य उपकेंद्रालाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
गोवेली ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला आणि पोलीस चौकीच्या अगदी मागील बाजूस असलेल्या जुन्या शासकीय संकुलात ग्रामपंचायत कार्यालय, पाणी तपासणी प्रयोगशाळा, आरोग्य विभागाचे उपकेंद्र तसेच आधार कार्ड केंद्र अशी महत्त्वाची कार्यालये कार्यरत आहेत. मात्र संकुलाच्या आजूबाजूला असलेल्या पडक्या इमारतींमुळे परिसरात तळीरामांचा मुक्त वावर असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मध्यरात्री कोणीतरी आजूबाजूच्या गवत व झाडाझुडपांना आग लावली असावी आणि तीच आग पसरत जाऊन प्रथम पाणी तपासणी प्रयोगशाळेला भीषण स्वरूप प्राप्त झाले असावे, अशी शंका व्यक्त होत आहे.
आगीत पाणी तपासणीसाठी वापरली जाणारी महागडी रासायनिक द्रव्ये, ड्रम, कॅन, संगणक, टेबल खुर्चा, कपाटे, पंखे तसेच अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे पूर्णतः जळून खाक झाली. आरोग्य उपकेंद्रातील २०१० ते २०२० या कालावधीतील सर्व रुग्णनोंदी व प्रशासकीय कागदपत्रे नष्ट झाली असून फर्निचर व इतर साहित्यही राख झाले आहे. ग्रामपंचायत कार्यालयाच्या छताचेही नुकसान झाले. सुदैवाने अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर दाखल झाल्याने आग आटोक्यात आली आणि पुढील मोठा अनर्थ टळला.
या पाणी तपासणी प्रयोगशाळेत कल्याण, मुरबाड व अंबरनाथ तालुक्यांतील पाण्याचे नमुने तपासले जात होते. मात्र प्रयोगशाळाच जळून खाक झाल्याने या तिन्ही तालुक्यांतील पाणी तपासणी व्यवस्थेवर मोठे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर घटनेमुळे शासकीय कार्यालयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, मोठी घटना घडूनही तालुका अधिकारी घटनास्थळी फिरकले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.