

भिवंडी : भिवंडी पालिका सार्वत्रिक निवडणुकीत खऱ्या अर्थान प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असताना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नारपोली भंडारी चौक या ठिकाणी भाजपा व काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारीची घटना घडली आहे.
या घटनमध्ये दोन्ही बाजूकडून लाठ्या काठ्या व दगडांचा मारा करण्यात आल्याने दोघेजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणामुळे या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
भंडारी चौक नारपोली येथे भाजपा उमेदवार व काँग्रेसचे उमेदवार यांचे कार्यालय हे रस्त्यामध्ये समोरासमोर आहेत. सायंकाळी काँग्रेस उमेदवारांची प्रचार रॅली या भागात आल्यानंतर काँग्रेस कार्यकत्यांनी जाणूनबुजून भाजपा कार्यालयाकडे जात घोषणाबाजी केली. ज्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाल्यानंतर दोन्हीकडून प्लास्टिक खुर्चा लाठ्या काठ्या व दगड भिरकावण्यात आले.
विशेष म्हणजे या चौकामध्ये बंदोबस्तावर पोलीस तैनात असतानाच रॅलीत सुद्धा पोलीस होते. त्यांच्या देखत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप भाजपच्या उमेदवाराने केला आहे. तर काँग्रेसकडूनही भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान या हाणामारीच्या घटनेनंतर नारपोली व भोईवाडा पोलीस ठाण्यातील मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल होत त्यांनी सौम्य लाठी चार्ज करून परिसरातील गर्दी पांगवण्यात आली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे यांनी भेट देत परिस्थिती शांत केली आहे. दोन्ही बाजूकडून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात येत आहे.
पोलीस फौजफाटा तैनात
भिवंडी पालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होत झालेल्या हाणामारीच्या घटनेमुळे परिसरातील वातावरण काही काळ तणावाचे झाले होते. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण अधिक तंग होऊ नये म्हणून परिसरातील गर्दी तत्काळ पांगवण्यात आली. दरम्यान या ठिकाणी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.