

नूतन बांदेकर
जागतिक तापमान वाढ व हवामान बदल या दोन निराळ्या गोष्टी असल्या तरी त्या परस्परांशी एकरूप असल्यासारख्या आहेत. सध्या ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमानात होत असलेली वाढ ही लक्षणीय आहे, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे जागतिक हवामानात नकारात्मक बदल होत आहेत. त्यामुळे तापमान वाढीची कारणे गेल्या अनेक लेखांमधून जाणून घेत आहोत. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे शोभेची दारू म्हणजेच फटाक्यांची आतिषबाजी हे सुद्धा आहे.
खरं तर फटाके आणि ग्लोबल वॉर्मिंगचा थेट संबंध आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण हे जागतिक तापमानवाढ वाढवण्या- मागील एक महत्त्वाचे कारण मानले जाते. फटाके आणि ग्लोबल वॉर्मिंगचा संबंध पुढीलप्रमाणे आहे.
फटाके फुटताना कार्बन डायऑक्साइड (उज), नायट्रोजन डायऑक्साइड (छज) आणि कार्बन मोनोऑक्साइड यांसारखे हानिकारक हरितगृह वायू वातावरणात सोडतात. हे वायू सूर्याची उष्णता शोषून घेतात आणि पृथ्वीचे तापमान वाढवतात. दिवाळी किंवा इतर उत्सवांच्या काळात फटाक्यांमुळे वायू प्रदूषणाची पातळी 30 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
फटाक्यांमध्ये बेरियम, स्ट्रॉन्शिअम, मॅग्नेशियम, तांबे व पोटॅशियमसारखे विषारी जड धातू असतात, जे हवेची गुणवत्ता खराब करतात. फटाक्यांमुळे निघणाऱ्या धुरामध्ये पीएम 2.5 आणि पीएम 10 हे सूक्ष्म कण असतात, जे वातावरणात बराच काळ राहतात.
फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण केवळ स्थानिक नसते, तर ते हवेसह पसरून जागतिक हवामान बदलात भर घालते. फटाक्यांमध्ये बहुधा गन पावडर वापरली जाते, जी कार्बन, सल्फर व पोटॅशियम नायट्रेट यांचे मिश्रण असते. आकर्षक रंग, आकार आणि चकाकी याकरिता त्यात रासायनिक घटक मिसळले जातात. खरंतर फटाक्यांच्या ज्वलनानेे अनेक हरितगृह वायू व विषारी पर्यावरणीय प्रदूषकांचे उत्सर्जन होते.
मोठ्या फटाक्यांच्या तुलनेत फुलबाजी सारख्या फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण व उष्णता कमी प्रमाणात असली तरी त्याद्वारेही सल्फर आणि कोळशावर आधारित प्रदूषण उत्सर्जित होत तापमान वाढ, प्रदूषणात भर घातली जातेच. एका संशोधनानुसार, फटाक्यांनी दरवर्षी अंदाजे 123, 422.5 मे.टन कार्बनचे उत्सर्जन होते असा अंदाज व्यक्त केला आहे. हे वार्षिक उत्सर्जन सुमारे 12 हजार गाड्यांच्या उत्पादनादरम्यान होणाऱ्या उे2 उत्सर्जनाइतके आहे.
साधारण 35 कि. दारूचे फटाके पूर्णत: जळल्यावर 17 किलो कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो. हे प्रमाण नवीन पेट्रोल इंजिन असलेल्या वाहनातून 88 मैल गाडी चालविण्याइतके आहे, जे वाहन प्रति मैल 190 ग्रॅ. उे2 उत्सर्जित करते. अर्थातच कोणतेही फटाके पर्यावरणास अनुकूल नाहीत, ते वातावरणात विविध रसायनांचे मिश्रण सोडतात व संपूर्ण परिसंस्थेला हानी पोहोचवतात.
फटाक्यांचे परिणाम
फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे वन्य पक्षी घाबरतात, ज्यामुळे ते जास्त वेळ व जास्त उंच उडतात. यामुळे ते नायट्रिक ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साइडसारख्या धोकादायक घटकांच्या संपर्कात येतात.
स्फोटक प्रतिक्रियेमुळे सूक्ष्म कण व कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साइड व नायट्रोजन डायऑक्साइडसारखे वायू बाहेर पडतात, जे अनेक दिवस हवेत रेंगाळतात. * जड धातू, माती मीश्रित कचरा, विषारी रसायने जमिनीवर पसरून माती व जलस्रोतांना दूषित करतात, ज्यामुळे जलीय परिसंस्थांना हानी पोहोचते. वर्षभरातील सण उत्सव, काही सार्वजनिक तर काही कौटुंबिक रित्या साजरे होतात, मात्र आनंद साजरा करण्यास फटाक्यांची आतषबाजी करणे, हा अलिखित नियम सर्वच पाळतात. जितका मोठा आनंद तितके जास्त फटाके फोडणे, हेही सर्वमान्य आहे.
पूर्वीच्या काळातील फटाके आणि आजच्या काळातील फटाक्यांत खूप बदल झालेले दिसतात. लग्नकार्य, मिरवणुका, वाढदिवस, विजयोत्सव अशा गोष्टी साजऱ्या करण्यासाठी फटाक्यांची आतिषबाजी व्हायलाच हवी का? दसरा, दिवाळी हे सणही फटाक्यां शिवाय साजरेच होऊ शकत नाहीत का? तर असे काहीच नाही. फटाके म्हणजे पैशांचा अपव्यय व पर्यावरणाची हानी! श्वसनाचे विकार व ग्लोबल वॉर्मिंगला आमंत्रण! कधी समजून घेणार आपण? पुढच्या पिढ्यांना काय आदर्श देतोय? आदी प्रश्न अनुत्तरित आहेत.
काही प्रगत देशांनी यावर उपाय म्हणून विजेची रोषणाई करून फटाक्यांना पर्याय दिला आहे; परंतु ही वीजनिर्मिती अपारंपरिक असेल, नविकरण ऊर्जा असेल तरच हा मार्ग वैध ठरू शकतो, अन्यथा औष्णिक वीज निर्मितीही तापमान वाढीस मदत करणारी आहे. आज फटाक्यांना पर्याय म्हणून काही गोष्टी करता येतील. ग्रीन फटाके हे पर्यावरणपूरक फटाके पारंपरिक फटाक्यांपेक्षा कमी प्रदूषण करतात व कमी हानिकारक वायू बाहेर पडतात.
प्रकाशोत्सव - फटाक्यांऐवजी पणत्या, मेणबत्त्या रोषणाई करून दिवाळी व तत्सम सण साजरे करणे हा पर्याय आहे. ध्वनी व वायू प्रदूषण कमी करणे - फटाके न उडवून/अत्यंत कमी उडवून आनंद साजरा करणे. फटाक्यांच्या अतिवापराने ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येत वाढ होत आहे, हे समजून घेणे, त्यासाठी पर्यावरणपूरक फटाके वापरणे किंवा फटाके न उडवता सण साजरा करणे ही आज काळाची गरज आहे.