

ठाणे: घोडबंदर रोडवर अपघातांची मालिका सुरूच आहे. आज दुपारच्या सुमारास आनंदनगर भागात डी-मार्ट माॅल जवळ भीषण अपघात झाला. एक महाकाय कंटेनर थेट रिक्षावर कोसळला या विचित्र अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे. दरम्यान, वारंवार होणाऱ्या अपघातामुळे वाहनचालकांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अत्यंत महत्वाचा समजला जाणारा घोडबंदर रोड मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावर दरदिवशी अपघात होत असून अनेक अपघातांमध्ये वाहनचालक तसेच प्रवाशांचा जीव गेला आहे.
आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ठाणे येथून घोडबंदर मार्गाच्या दिशेने रासायनिक टँकर वाहतूक करत होता. हा टँकर आनंदनगर परिसरात आला असता, चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर रस्त्यावर उलटला.
त्यावेळी टँकरच्या बाजूने रिक्षा जात होती. त्या रिक्षावर रासायनिक टँकरचा मागील टँक उलटला. यामध्ये रिक्षाचालक दशरथ पवार आणि प्रवासी मोहम्मद अमीन यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे सहकारी अमजित अन्सारी हे जखमी असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कंटेनरचालक पसार ; पोलिसांकडून शोध सुरु
हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचा पूर्णत: चक्काचूर झाला. क्रेनच्या सहाय्याने टँकर रिक्षावरून बाजूला करण्यात आला. त्यानंतर टँकर खाली दबलेल्या दशरथ आणि मोहम्मद यांचा मृत्यदेह बाहेर काढण्यात आला.
तर जखमी अमजित यांना ओवळा येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, रासायनिक वाहून नेणारा कंटेनरचालक पसार झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.