Thane Rice Sowing: शहापूर-मुरबाड तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट; अतिवृष्टीमुळे वाफे पाण्‍याखाली

शेतकऱ्यांना सलग पावसाचा फटका
Thane Rice Sowing
Thane Rice SowingPudhari
Published on
Updated on

शहापूर: मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या पेरणीयोग्य पावसानंतर शहापूर व मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील भात पेरणीला वेग दिला होता. मात्र १ जुलैनंतर सुरू झालेल्या संततधार मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले असून दोन्ही तालुक्यांमधील अनेक भागांमध्ये दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

शहापूर तालुक्यातील लेनाड, शेंद्रूण, नडगाव, नांदवल, डोळखांब,पेंढरी, कळमगाव तर मुरबाड तालुक्यातील सरळगाव, टोकावडे, धसई, शिवळे, नारिवली परिसरासह शहापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पेरणी केलेले भात बियाणे पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेले.

Thane Rice Sowing
Thane Heavy Rain: ठाण्यात मागच्या वर्षीएवढा सरासरी पाऊस; चार दिवसात तिघांचा मृत्यू, ९ गंभीर जखमी

दरम्यान काही ठिकाणी उगवलेली कोवळी रोपे अनेक दिवस पाण्याखाली राहिल्याने कुजून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने पेरणी करण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी अतिरिक्त खर्च करून गादीवाफ्यावर भाताची रोपे तयार केली होती.

अतिवृष्टीमुळे गादीवाफेही पाण्याखाली गेल्याने रोपे नष्ट झाली. यामुळे बियाणे, मजुरी, मशागत व इतर खर्च वाया गेला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शहापूर व मुरबाड हे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख भात उत्पादक तालुके असून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते.

Thane Rice Sowing
Raigad LPG Cylinder: हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे ३ हजार सिलेंडर गेले वाहून

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार शहापूर तालुक्यात सुमारे १७ हजार हेक्टर, तर मुरबाड तालुक्यात सुमारे १८ ते १९ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते.

यंदा या मोठ्या क्षेत्रातील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसल्याने हजारो शेतकरी चिंतेत आहेत. तथापि शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानग्रस्त क्षेत्राचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कृषी विभागानेही प्रत्यक्ष पाहणी करून दुबार पेरणीसाठी बियाणे व आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पहिल्या पेरणीसाठी हजारो रुपये खर्च केले. आता बियाणे वाहून गेली, रोपे कुजली. पुन्हा बियाणे, मशागत आणि मजुरीचा खर्च करावा लागणार आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहील.

- सुशांत हरड, शेतकरी, डांगूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news