

कासा: पालघर जिल्ह्यात गेल्या सात-आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक रस्ते, पूल आणि साकव पाण्याखाली गेले आहेत.
अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने सलग सोमवार आणि मंगळवारी रेड अलर्ट जारी केला होता.
या मुसळधार पावसाचा डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. सोनाळे येथील खुबरोख पाड्यावर मंगळवारी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास यशवंत सापटा यांचे राहतं घर अचानक कोसळले. त्या वेळी घरामध्ये झोपलेल्या आठ जणांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, घर पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याने घरातील अन्नधान्य, कपडे, घरगुती साहित्य आणि इतर संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घरालगत बांधलेली जनावरेही जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. भर पावसात सापटा कुटुंब उघड्यावर आले असून राहण्यासाठी छत आणि खाण्यासाठी अन्नधान्यही शिल्लक नसल्याने शासनाने तातडीने आर्थिक मदत व निवाऱ्याची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे वेती येथील कातकरी पाड्याला जोडणारा साकवही पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला आहे. त्यामुळे २०० हून अधिक लोकवस्ती असलेल्या आदिम कातकरी समाजाचा मुख्य संपर्क तुटला असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मागील वर्षी या पाड्याकडे जाणारा रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, जुनाच साकव कायम ठेवल्याने तो यंदाच्या पावसात वाहून गेला. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे शिक्षण, मजुरांचे रोजगारासाठी ये-जा करणे तसेच ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे.
मुख्य बाजारपेठेशी संपर्क साधणारा हा एकमेव मार्ग असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे वेती गावाची स्मशानभूमीही याच कातकरी पाड्याजवळ असल्याने भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडल्यास अंत्यविधीसाठीही गंभीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी तातडीने कायमस्वरूपी लोखंडी पूल उभारण्याची मागणी केली आहे. घटनेची गंभीर दखल घेत डहाणूच्या प्रांताधिकारी विशाल खत्री तसेच डहाणू पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी वेती कातकरी पाड्याला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याची माहिती मिळाली आहे.
मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यातील अनेक दुर्गम गावपाड्यांमध्ये नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत आणि पूरग्रस्त भागातील संपर्क व्यवस्था पूर्ववत करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.