Gas Shortage: चुलीच्या धुरात हरवतंय गरीब महिलांचं आयुष्य; सिलिंडरच्या टंचाईमुळे पुन्हा चुलीकडे वळण्याची वेळ

पूर्वांपार चालत आलेलं महिलांचं जीवनमान पाहता आताही गरीब महिलांचं आयुष्य हे चुलीच्या धुरात हरवू पाहात असल्याचे दिसून येत आहे.
Gas Shortage
Gas ShortagePudhari
Published on
Updated on

अजय शेलार

टिटवाळा: गॅसचा तुटवडा, महागाईचा तडाखा आणि जगण्यासाठीची झुंज या सगळ्या संकटांच्या छायेत एक हृदयद्रावक वास्तव सध्या समोर येत आहे. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे ग्रामीण भागातील गरीब महिला चुलीचा आसरा घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे पूर्वांपार चालत आलेलं महिलांचं जीवनमान पाहता आताही गरीब महिलांचं आयुष्य हे चुलीच्या धुरात हरवू पाहात असल्याचे दिसून येत आहे.

चुलीसाठी लागणारं साहित्य, लाकूड फाटा गोळा करण्यासाठी महिलांचा आटापिटा दिसून येत आहे. शहरात आधुनिक सुविधा उपलब्ध असल्या तरी समाजाच्या एका मोठ्या घटकाला अजूनही मूलभूत गरजांसाठी झगडावे लागत आहे. सिलिंडर मिळत नसल्याने आणि वाढत्या किमतींमुळे अनेक कुटुंबांनी पुन्हा चुलीकडे वळण्याची वेळ आली आहे. मात्र या सर्व परिस्थितीत सर्वात जास्त हाल होत आहेत ते गरीब आणि वृद्ध नागरिकांचे.

Gas Shortage
Thane LPG Shortage: हातावर पोट असलेल्या कामगारांना गॅस टंचाईची झळ, गावी परतीचा प्रवास

दररोजच्या जगण्याची लढाई लढणाऱ्या एका वृद्ध महिलेची अवस्था या संकटाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. हातात काठी, डोक्यावर लाकडांचा जड भार आणि अंगावर वर्षानुवर्षांची झीज अशा अवस्थेत ही महिला दररोज लाकूड गोळा करताना दिसते. तिच्यासाठी चूल ही केवळ स्वयंपाकाचे साधन नाही, तर जगण्याचा एकमेव आधार बनली आहे.

गॅस नसल्यामुळे तिला रोज धुरात बसून चूल पेटवावी लागते आणि त्या धुराचा त्रास सहन करत पोटाची खळगी भरावी लागते. या प्रक्रियेत तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. डोळ्यांची जळजळ, श्वास घेण्यास त्रास, अंगावर येणारा उष्णतेचा दाह हे तिच्या आयुष्याचा भाग बनले आहे. तरीही पर्याय नसल्यामुळे ती हीच दिनचर्या स्वीकारून जगत आहे. तिच्यासारख्या अनेक महिलांची हीच अवस्था आहे, जिथे आधुनिकतेच्या गप्पांमध्ये त्यांच्या वेदना मात्र कुणालाही दिसत नाहीत.

Gas Shortage
Chilli Price: मिरच्यांच्या वाढत्या दरामुळे घरगुती मसाला ठरतोय महागडा; कडक उन्हातही गृहिणींची लगबग

महागाईमुळे गॅस सिलिंडर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे, तर पुरवठ्याच्या समस्येमुळे अनेकांना वेळेवर सिलिंडर मिळत नाही. परिणामी, पुन्हा चुलीचा धूर आणि कष्टमय जीवन याकडे लोक ढकलले जात आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ अशा गरजूंपर्यंत पोहोचत नसल्याची वस्तुस्थितीही यामुळे समोर येते.

मूलभूत सुविधांची आवश्यकता...

ही केवळ एका महिलेची कहाणी नाही, तर व्यवस्थेतील त्रुटींचा आरसा आहे. संबंधित यंत्रणांनी तत्काळ याची दखल घेऊन अशा नागरिकांना गॅससारख्या मूलभूत सुविधांचा नियमित आणि परवडणारा पुरवठा सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे. नाहीतर, ही वृद्ध महिला आणि तिच्यासारख्या हजारो जणींच्या आयुष्यातील चुलीचा धूर हा कधीच संपणारा नाही आणि त्यांच्या वेदनांची कहाणी अशीच निःशब्दपणे धुरात विरून जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news