Chilli Price: मिरच्यांच्या वाढत्या दरामुळे घरगुती मसाला ठरतोय महागडा; कडक उन्हातही गृहिणींची लगबग

घरगुती मसाला बनविण्याची परंपरा आजही टिकून
Chilli Price
Chilli PricePudhari
Published on
Updated on

किशोर गायकवाड

मुरबाड शहर: कडक उन्हाळ्याची चाहूल लागताच गृहिणींची लगबग सुरू होते. गृहोपयोगी साहित्याच्या वाळवणासह वर्षभर पुरेल इतका मसाला बनविण्यासाठी पावसापूर्वी तयारी केली जाते. खेडोपाड्यातील महिलांची ही लगबग पाहता वर्षभरासाठी घरगुती तिखट मसाला तयार करण्याची परंपरा आजही टिकून असून, बाजारात लाल मिरच्या दाखल होताच खरेदीसाठी महिलांची गर्दी वाढताना दिसत आहे.

यंदा मात्र मिरच्यांच्या वाढलेल्या दरामुळे मसाला बनवणे महागडे ठरत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रीयन जेवणात तिखट मसाला हा जणू ‌‘आत्मा‌’ मानला जातो. सुक्या मिरच्या (बेडगी, शंकेश्वरी, लवंगी), धने, जिरे, लसूण आणि इतर खड्या मसाल्यांपासून तयार होणारा हा मसाला पदार्थांना झणझणीत चव आणि आकर्षक लालसर रंग देतो. तयार केलेला घरगुती मसाला हा चांगला वर्षभर टिकतो.

Chilli Price
Bhiwandi Crime: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; वीटभट्टी मजूर पतीस अटक

उन्हाच्या कडकडीत तापातही महिलांची ही धावपळ पाहता, घरगुती मसाल्याची त्याचसोबत हळद, धने पावडर बनविण्याची परंपरा अजूनही तितक्याच जोमाने जपली जात असल्याचे स्पष्ट होते. वाढत्या खर्चाचा फटका बसत असला तरी चवीचा हा वारसा जपण्यासाठी गृहिणींचे प्रयत्न सुरूच आहेत.

गावाकडील महिलांसाठी मसाला बनवणे ही केवळ घरगुती कामगिरी नसून एक प्रकारची परंपरा आणि कुटुंबाची जबाबदारी मानली जात आहे. बाजारातून मिरच्या खरेदी करून त्या प्रथम कडक उन्हात नीट वाळवून त्यानंतर मिरच्यांचे देठ काढणे, त्यांची निवड करणे ही मेहनतीची कामे केली जातात. पुढे त्या गिरणीत दळण्यासाठी नेल्या जातात.

दळून आणलेला गरम मसाला थेट वापरात न आणता तो खुल्या जागेत थंड केला जातो. चव आणि रंग अधिक उठावदार होण्यास वेगवेगळ्या प्रकारच्या मिरची पावडरचे प्रमाण सांभाळून मिश्रण केले जाते. शेवटी हा मसाला हवाबंद डब्यांत साठवून ठेवला जातो. वर्षभर त्याचा वापर करता येईल. या प्रक्रियेस अनेक दिवस लागतात.

वाढलेले दर चिंतेचा विषय

यंदा मिरच्यांच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याने गृहिणींचे गणित बिघडले आहे. लवंगी व बांडी मिरचीचे दर सुमारे 300 ते 350 रुपये किलोपर्यंत पोहोचले असून बेडगी मिरची 500 ते 600 रुपये किलो दराने विकली जात आहे. याशिवाय धने, जिरे, अख्खा गरम मसाला आणि इतर मसाल्यांच्या किमतीतही वाढ झाल्याने एकूण खर्च वाढला आहे.

Chilli Price
Online Betting: ऑनलाइन सट्टेबाजीच्या जाळ्यात ग्रामीण भागातील तरुणांचाही ओढा

आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर...

घरातील सदस्य संख्येनुसार मसाला तयार केला जातो. अनेक कुटुंबांत हा मसाला सासरी असलेल्या मुलींना भेट म्हणून देण्याची प्रथा आजही जपली जाते. त्यामुळे या कामाला भावनिक महत्त्वही आहे. आजच्या काळात आधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून मसाला बनवण्याच्या सुधारित पद्धती, प्रमाण आणि साठवणूक तंत्र विकसित होत आहेत. मात्र पारंपरिक पद्धतीतील योग्य प्रमाणात मसाले भाजणे, स्वच्छता राखणे आणि हवाबंद साठवणूक करणे यामुळे मसाल्याची गुणवत्ता टिकवून ठेवता येते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news