

सापाड (ठाणे) : कल्याण पश्चिम गांधारी परिसरात असलेल्या भंडारी गणेश घाटावर सध्या एक गंभीर प्रकार समोर आला आहे. सीआर झोन म्हणून घोषित केलेल्या या परिसरातील गणेश घाटावर भराव टाकून जमीन गिळंकृत करण्याचा डाव सध्या सुरू असून, यामुळे गणपती विसर्जनाच्या पारंपरिक जागेवरच संकट निर्माण झाले आहे.
हा गणेश घाट कल्याणमधील एक प्रमुख विसर्जन घाट असून दरवर्षी हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन येथे केले जाते. परंतु सध्या काही या घाटावर भराव टाकण्यास सुरुवात केली आहे. हे काम सुरू असताना, संबंधित प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे.
आगामी गणेशोत्सव अगदी जवळ आला असताना, गणेश विसर्जनासाठी गणेश घाटावर जागा उपलब्ध न राहिल्यास हजारो गणेशभक्त आणि सार्वजनिक मंडळांसमोर मोठा पेच निर्माण होऊ शकतो.
या घाटावर विसर्जन होणार्या मूर्तींची संख्या प्रचंड आहे आणि पर्यायी घाटांची व्यवस्था अद्यापही पालिकेने जाहीर केलेली नाही. या गंभीर प्रकाराची स्थानिक नागरिकांनी, पर्यावरणप्रेमींनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार महापालिका आणि संबंधित अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
दरम्यान सीआर झोनमधील भराव तत्काळ हटवावा. संबंधितांवर कडक कारवाई करून गणेश घाटाची तातडीने पुनर्बांधणी आणि संरक्षण करावे. विसर्जनासाठी पर्यायी जागांची तत्काळ घोषणा करावी. पर्यावरण विभाग, पोलीस आणि पालिका यांनी संयुक्त तपास सुरू करावा. अशी मागणी होत आहे.
गांधारी गावातील भंडारी गणेशघाट सुशोभीकरणासाठी नुकतेच आ. विश्वनाथ भोईर यांनी दीड कोटी रुपये मंजूर करून गणेश घाटावर जेट्टीची दुरुस्ती, गणेशघाटाचे सुशोभीकरण, शेडसारख्या सुविधा करण्यात आल्या होत्या. मात्र करोडो रुपये खर्च करून सुशोभित करण्यात आलेला गणेश घाटाची सध्याची स्थिती पाहता कराडो रुपये वाया जाणार असल्याच्या चर्चा करण्यात येत आहेत.