

कोल्हापूर : यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीत डोळ्यांना घातक ठरणार्या लेसर वापरावरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी स्पष्ट केले. तसेच कर्णकर्कश साऊंड सिस्टीमवर निर्बंध घालण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्यांची पोलिस मुख्यालयात बैठक झाली. यावेळी पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या अधिकार्यांना सक्त सूचना केल्या.
सार्वजनिक गणेशोत्सव अवघ्या महिन्यांवर आला आहे. शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची आतापासून तयारी सुरू झाली आहे. मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे. रस्त्याच्या मध्यभागी मंडप उभे करून वाहतुकीला अडचण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. रस्त्याच्या एका बाजूला आपत्कालीन मार्ग ठेवण्याची गरज आहे. यावर वाहतूक नियंत्रण शाखेसह पोलिसांनी लक्ष ठेवावे, असेही ते म्हणाले.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी मोहरम व त्र्यंबोली यात्रेत अनेक मंडळांकडून साऊंड सिस्टीमचा वापर करण्यात आला. याशिवाय लेसरचाही वापर झाल्याच्या तक्रारी आहेत. लेसरमुळे नागरिकांच्या डोळ्याला त्रास होऊ शकतो. गणेशोत्सव मिरवणूक काळात या लेसरची सर्वाधिक झळ बंदोबस्तासाठी नियुक्त पोलिस कर्मचार्यांना सोसावी लागते. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीत लेसरचा वापर होणार नाही, याची प्रभारी अधिकार्यांनी खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील सर्वात मोठा सण म्हणून गणेशोत्सव ओळखला जातो. याचा वाढता उत्साह पाहून राज्य सरकारने गणेशोत्सव हा ‘राज्य उत्सव’ म्हणून घोषणा केली आहे. त्यामुळे देशात महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य प्रशासन व पोलिस खात्याने मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आपली कंबर कसली आहे. जिल्हा पोलिसप्रमुखांनी बैठका घेत पोलिस अधिकार्यांना उत्सव बिभत्स करणार्या गोष्टींवर निर्बंध घालण्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.