

नाशिक : चौदा विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या श्री गणरायाच्या आगमनाची चाहूल आता परदेशातील मराठी भक्तांनाही लागली आहे. मूर्तीकार मयूर मोरे आणि त्यांच्या परिवाराने तयार केलेल्या सुबक व पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणेशमूर्तींना अमेरिका, इंग्लंड आणि दुबईतील गणेशभक्तांकडून मागणी होत आहे. यंदाही सुमारे ४५० मूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या असल्याची माहिती मोरे यांनी दिली. विशेष म्हणजे, यावर्षी प्रथमच नायजेरियामधूनही गणेशमूर्तींची मागणी प्राप्त झाली आहे. गणेशोत्सव परदेशस्थ मराठी समाजाला त्यांच्या मुळांशी जोडणारा ठरत आहे.
नाशिकच्या पर्यावरणपूरक आणि सुबक गणेशमूर्तींना राज्यासह देशात आणि विदेशातही मागणी असते. यंदा मोर परिवाराने सहा महिन्यांपूर्वीच नोंदणी सुरू केली होती. शाडूमातीपासून निर्मित सूबक, आकर्षक श्रींच्या मूर्ती कुरीयरव्दारे सातासमुद्रापार जात आहेत. अमेरिका, दुबई आणि इंग्लंडमधील भाविकांपर्यंत १९ जुलैपर्यंत मूर्ती पोहोचल्या आहेत. त्यावर साधारणत: एक हजार ते आठ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. तुलनेत सागरी मार्गे कमी खर्च येतो. आता देशातील गणेशभक्तांकडून मूर्तींसाठी बुकिंगला प्रारंभ झाला आहे. गणेशमूर्ती पाठवण्यासाठी विशेष प्रकारची पॅकिंग आवश्यक असते.
गेल्या नऊ दशकांपासून आमचे कुटुंब श्री गणरायाची सेवा करत आहे. या सेवेला आता जागतिक स्तरावर चांगला प्रतिसाद लाभतोय. नुकत्याच नाशिकमधील मूर्ती विदेशात यशस्वीरीत्या पोहोचल्या. परदेशातील भारतीयांना आपल्या संस्कृतीविषयी अधिक जिव्हाळा असल्याने अशा उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळतो. यापुढेही नाशिकचे बाप्पा जगभर पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे.
मयूर मोरे, मूर्तीकार, नाशिक.
पॅकिंगसाठी प्लास्टिक, थर्माकोल यांसारख्या पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या घटकांचा वापर टाळला जातो. त्याऐवजी तांदुळ पिकाचे वजनाने हलके असलेले तणस वापरण्यात येते. मूर्तीच्या उंची व आकारानुसार द्विस्तरीय ‘कार्टरेज बॉक्स’ तयार करून घेतले जातात. या बॉक्समध्ये मूर्ती ठेवण्यापूर्वी सर्व बाजूंनी भाताचे तणस नीट रचले जातात, जेणेकरून मूर्ती हलू नये. त्यामुळे मूर्ती सुरक्षित राहते आणि पॅकिंगचे वजनही कमी होते.